Phaltan panchayat samiti scam: फलटण पंचायत समितीत ‌‘पगार घोटाळा‌’

वीस लाखांचा अपहार; प्रशासनावरच कर्मचारी शिरजोर
scam
ScamFile Photo
Published on
Updated on

फलटण : फलटण पंचायत समितीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कनिष्ठ लिपीक/अभियंत्याकडून तब्बल 20 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. पोर्टल प्रणालीचा गैरवापर करून स्वतःच्या पगारात बेकायदेशीर वाढ करत शासनाच्या तिजोरीवर डाका टाकण्याचा हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू होता. या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित कर्मचाऱ्याने 2023 ते 2025 या कालावधीत सॅलरी परिपत्रकात फेरफार करून स्वतःचाच पगार वाढवत लाखो रुपये उकळले. हा प्रकार उघडकीस येताच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याआधी त्याने खंडाळा, फलटण, पाटण असा ‌‘कारकिर्दीचा प्रवास‌’ केल्याची चर्चा आहे.

एखादा कर्मचारी स्वतःचाच पगार वाढवत लाखो रुपये उकळत असताना जिल्हा परिषद किंवा राज्याच्या आर्थिक यंत्रणेला याची कल्पना नव्हती का? स्थानिक अधिकारी पगार पत्रकावर सह्या करताना अचानक पगार वाढला कसा याबाबत त्यांना शंका आली नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधिताने स्वतःचाच पगार वाढवलाय की अन्य कोणाचा हा पगार वाढवण्याचा प्रताप केलाय, याची खमंग चर्चा सुरू झाली आहे. फलटण पंचायत समितीत यापूर्वीही अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, वरिष्ठांकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून संपूर्ण कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

फलटण पंचायत समितीतील हा पगार घोटाळा केवळ आर्थिक अपहार नसून प्रशासकीय यंत्रणेतील ढिसाळपणा, निष्काळजीपणा आणि संभाव्य संगनमताचे चित्र आहे. आता चौकशीचा अहवाल येईपर्यंत नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. दरम्यान, फलटण पंचायत समिती मधील प्रशासकीय राजवट कालखंडातील विविध खात्यांच्या कामाचे आर्थिक व्यवहाराची तपासणी केली तर अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news