Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala : पालखी सोहळ्यासाठी २३०० पोलिसांचा बंदोबस्‍त

विविध पथकेही राहणार तैनात : आणखी १६ जणांच्‍या तडीपारीचा प्रस्‍ताव
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
पालखी सोहळ्यासाठी २३०० पोलिसांचा बंदोबस्‍त
Published on
Updated on

शशिकांत जाधव

लोणंद : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे दि. १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. दि. १५ ते १८ जुलैदरम्यान पालखी मुक्कामाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा पोलिसांनी बंदोबस्‍ताचे नियोजन केले आहे. पालखी सोहळ्यात अडथळा ठरू शकणाऱ्या २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. सोहळ्‍यासाठी तब्‍बल २ हजार ३०० पोलिसांचा बंदोबस्‍त राहणार आहे. यासह विविध पथके कार्यरत राहणार आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलाकडून ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस, ९७ महिला पोलीस, १,१०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड, ७५ वाहतूक पोलीस, आरसीपीच्या २ प्लाटून आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेरून १८ अधिकारी, कोल्हापूर व सांगली येथून प्रत्येकी १४० पोलीस अंमलदार, रायगड येथून १० अंमलदार, ३० अतिरिक्त वाहतूक पोलीस तसेच एसआरपीएफची एक कंपनी बंदोबस्तासाठी मागवण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याचे नियोजन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गर्दीचा फायदा घेऊन चोरी-पाकिटमारी करणारे, महिलांची छेडछाड करणारे तसेच बेदरकार वाहनचालक यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होताना संशयित व समाजकंटकांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सातारा पोलीस प्रशासनाने नागरिक व वारकऱ्यांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news