

फलटण : डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटतात. मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत आणणे हीच त्यांच्या व्यवसायाची ओळख. मात्र, फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयाशी संबंधित दोन उच्चशिक्षित डॉक्टरांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी वैद्यकीय व्यवस्थेची एक वेदनादायी बाजू समोर आणली आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर काही काळातच डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येची घटना घडली. या सलग घटनांनी फलटणच्या वैद्यकीय क्षेत्राबरोबरच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
या घटनांमागील नेमकी कारणे काय होती, याचा तपास कायदेशीर यंत्रणा करेलच. मात्र, त्यासोबत संबंधित डॉक्टरांच्या सेवाकालातील परिस्थिती, कामाचा ताण, तक्रारी, वरिष्ठांशी झालेले संवाद, प्रशासकीय आदेश आणि आत्महत्येपूर्वी व्यक्त केलेल्या कोणत्याही अडचणी यांचीही वस्तुनिष्ठ छाननी होणे गरजेचे आहे. विशेषतः डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी आत्महत्येपूर्वी काही प्रकारे इशारा दिला होता, तक्रारी मांडल्या होत्या किंवा मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती, अशी माहिती अधिकृत तपासात समोर येत असल्यास तिची गंभीर दखल घेतली पाहिजे.
एखादी व्यक्ती टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी मदतीची हाक देत असेल आणि ती वेळेत ऐकली गेली असती, तर अनर्थ टाळता आला असता का, हा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. संबंधित डॉक्टरवर कामाचा किंवा प्रशासकीय दबाव होता का? मानसिक त्रास, अपमानास्पद वर्तन किंवा इतर अडचणींबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागितली होती का? मागितली असल्यास त्यावर काय कार्यवाही झाली? या प्रश्नांची उत्तरे निष्पक्ष तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
या दोन्ही घटनांच्या संदर्भात तळहातावर काही शब्द लिहून इशारा दिल्याची चर्चा आहे. ही बाब अधिकृत तपासात सत्य ठरल्यास ती अत्यंत गंभीर आहे. कारण एखादी व्यक्ती आपल्या शेवटच्या क्षणी मनातील वेदना किंवा असहायता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या संकेतांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरते. तळहातावर लिहिलेला संदेश हा मदतीसाठीचा शेवटचा प्रयत्न होता का? तो कोणाच्या निदर्शनास आला होता का? आला असल्यास त्याची दखल घेतली गेली का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळाली पाहिजेत. मात्र, केवळ चर्चेच्या आधारे कोणावरही दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. सत्य अधिकृत तपासातूनच स्पष्ट झाले पाहिजे.
पहिल्या घटनेनंतर काय बदलले?
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा, कामाच्या ताणाचा आणि कार्यपरिस्थितीचा आढावा घेतला का? डॉक्टरांशी संवाद वाढवला का? त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कोणती यंत्रणा उभी केली? मनुष्यबळाची कमतरता, ड्युटीचे स्वरूप, वरिष्ठांचा दबाव अथवा प्रशासकीय अडचणी यांचा अभ्यास झाला का? जर हे सर्व उपाय करण्यात आले असतील, तर त्यानंतरही अशी दुसरी घटना का घडली, हा प्रश्न निर्माण होतो. आणि प्रतिबंधात्मक उपाय केले नसतील, तर पहिल्या घटनेतून प्रशासनाने नेमका कोणता धडा घेतला, याचेही उत्तर मिळणे आवश्यक आहे.
‘फलटणला पोस्टिंग नको’ अशी भावना निर्माण होऊ नये
या घटनांचा परिणाम केवळ रुग्णालयाच्या चार भिंतींपुरता मर्यादित राहणार नाही. सेवा देण्यासाठी फलटणमध्ये येणाऱ्या डॉक्टरांच्या मनात कार्यपरिस्थितीबद्दल भीती निर्माण झाली, तर त्याचा थेट परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो. ‘फलटणला पोस्टिंग नको’ अशी भावना वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होणे ही शहरासाठी निश्चितच चिंतेची बाब ठरेल. डॉक्टर सतत मानसिक तणावाखाली काम करत असतील, तर त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने रुग्णसेवेवर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षित, सन्मानजनक आणि विश्वासाचे वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.