

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईक, फडतरी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थ, धनगर समाजबांधव तसेच विविध समाजघटकांतील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. डॉ. रूपनवर यांना न्याय मिळावा, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मंगळवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढून तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, डॉ. रूपनवर यांचा मृतदेह रुग्णालयासमोर ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृत्यूने फलटणमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्याचे पडसाद उमटले. डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या सोलापूर जिल्ह्यातील फडतरी गावचे नागरिक आक्रमक झाले. त्यांनी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयावरच मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढल्याने उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून दूर राहण्याची विनंती केली. ‘रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ,’ असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केल्यानंतर ते रुग्णालयाबाहेर एकत्र राहिले.
माळशिरस, पंढरपूर, फलटण, बारामती आदी भागांतून धनगर समाजबांधव तसेच विविध सामाजिक व स्थानिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतशी आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत गेली. जिल्हास्तरावरून डॉ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक फलटणमध्ये दाखल झाले. पथकाने डॉ. रूपनवर यांच्या कुटुंबीयांशी तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळणाऱ्या संबंधित व्यक्तींची नावे पोलिस ठाण्यात द्यावीत, त्यानुसार पुढील कार्यवाहीबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. दिवसभर आंदोलनकर्त्यांनी संयमाने आपला संताप व्यक्त केला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आंदोलन स्थगित केले.
आज पुन्हा आंदोलनाचा इशारा
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार नातेवाईक व आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या पार्थिवासह पुन्हा फलटण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई, स्वतंत्र एसआयटी चौकशी, एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील पात्र व्यक्तीस शासकीय नोकरी या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत डॉ. रूपनवर यांचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे फलटणसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.