

फलटण : फलटण तालुक्यात लाखो रुपयाच्या बनावट खत विक्रीची खमंग चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून यामध्ये जिल्ह्यातील कृषी विभागातील एका अधिकार्याने कारवाईचा बडगा दाखवून मोठा आर्थिक झोल केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात तुळजापूरच्या देवीच्या नावे असलेले कृषी दुकान हे बनावट खत विक्री रॅकेटचे केंद्रबिंदू बनले आहे. वीस लाखांचा झोल करून हे प्रकरण दाबल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
शेत पीक जोमदार येण्यासाठी शेतकरी महागडी रासायनिक खते खरेदी करुन पिकांना टाकतो. शेत पिकांना टाकलेले ते खत बनावट असेल याची पुसटशी शंकाही त्याच्या मनात येत नाही. मात्र कृषी दुकानदार शेतकर्यांचा विश्वासघात करुन पैसे कमावण्यासाठी शेतकर्यांची घोर फसवणूक करतो. या फसवणुकीस बनावट खत विक्री रोखण्यासाठी ज्यांची नियुक्ती झालेली असते असे काही शासकीय कृषी अधिकारीच पैशासाठी स्वतःला विकतात व अशा कृष्णकृत्यास साथ देतात ही मोठी शरमेची बाब आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील कृषी विभागातील एका कथित अधिकार्याने फलटणच्या पश्चिम भागातील त्या दुकानातील सॅम्पल तपासणीसाठी घेऊन ते कोल्हापूरला पाठवल्याची माहिती मिळत आहे. त्याचा अहवालही गुलदस्त्यात आहे. ज्या बनावट खताची विक्री होते ते खत 9: 24: 24 असे आहे. मूळ किमतीपेक्षाही शंभर ते सव्वाशे रुपये कमी किमतीत ते खत विकले जात होते? कमी किंमतीत खत विक्री होण्या पाठीमागचे नेमके गौड बंगाल बनावट खत विक्रीशी असल्याची चर्चा वाढली आहे.
याबाबत तालुका व पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधला असता शासनाने कृषी दुकानांच्या तपासणीसाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. कृषी दुकानावर आता आमचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुका गुण नियंत्रण अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता तालुकास्तरावरून त्या दुकानाची कोणतीही तपासणी झाली नाही. बनावट खत विक्रीबाबत कोणतीही तक्रार आली नसून त्या दुकानातून कोणत्याही प्रकारचे सॅम्पल मी घेतले नाही. त्या दुकानाची तपासणी माझ्याकडून झाली नाही. बनावट खत विक्री बाबतच्या घटनेवर व चाललेल्या चर्चेबाबत त्यांनी कानावर हात ठेवत जिल्हास्तरावरून तपासणी झाली असेल तर माहिती घेतो असे सांगितले होते. मात्र त्यानंतर कोणतीच माहिती त्यांनी दिली नाही.
कथित जिल्हास्तरीय कृषी अधिकार्याचे त्या गावात अधून-मधून ये-जा असते. त्या दुकानदाराकडेही त्याचे येणे-जाणे असते. त्या अधिकार्यानेही रेड बाबत कानावर हात ठेवत तपासणी करण्याचा, सॅम्पल घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. बनावट खत विक्रीबाबत काही माध्यम प्रतिनिधींनी माझ्याकडे विचारणा केली. मात्र तालुकास्तरावरील गुण नियंत्रक अधिकारीच सॅम्पल घेऊन पाठवू शकतो आम्हाला तो अधिकारच नाही. तालुकास्तरीय गुण नियंत्रक अधिकारी बरोबर असल्याशिवाय तपासणी करू शकत नाही, असे सांगितले. अधिकार्यांनी गोलमाल उत्तरे दिली असली तरी मोठा झोल झाल्याची चर्चा सुरु आहे. संबंधित खत दुकानदारावर रेड झाल्याची अनेक जण ठोस चर्चा करत आहेत.
मात्र तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नाही. संबंधित दुकानात सीसीटीव्ही असतील तर गत दोन महिन्यातील सर्व फुटेज तपासावेत एकंदरीत झालेली खत विक्री त्या दुकानात कोणता अधिकारी आला होता? त्यांच्याबरोबर कोण होते? याचाही खुलासा होऊ शकतो. या रॅकेटमध्ये जिल्ह्यातील 10-12 जण असून तालुक्यातील 2-3 बडे दुकानदार सहभागी असल्याची चर्चाही सुरु आहे.बनावट खत विक्री करणार्या दुकानदाराला वाचवण्याचे कृष्णकृत्य कृषी अधिकारी करत असून कथित 20 लाख रुपये झोलच्या चर्चेच्या मुळाशी जाऊन घटनेची सखोल चौकशी करावी. जर शासनाचे अधिकारी भ्रष्टाचार करून खत दुकानदारांना अभय देत असतील तर शेतकर्यांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची?