

कराड : सैदापूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार सागर शिवदास यांच्या उमेदवारीवरील हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल हा पक्षपातीपणाचा असल्याचा आरोप करून या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्याची माहिती तक्रारदार आणि अपक्ष उमेदवार मोहन उर्फ नरहरी जानराव यांनी शुक्रवारी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात कराड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कायद्याची पायमल्ली झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी बनवडीचे माजी सरपंच शंकरराव खापे, बनवडी ग्रामपंचायत सदस्य अख्तर आतार, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, इर्शाद आवटी, पक्षकारांचे वकील ॲड. धैर्यशील पाटील, राजू लादे उपस्थित होते. जानराव म्हणाले, गुरुवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान सागर शिवदास यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना तीन अपत्ये लपवली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शन आणून दिले. तीन अपत्यांचे जन्माचे शासकीय दाखले पुरावा म्हणून सादर केले. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे पुरावे विचारात न घेता निकाल दिला आहे. त्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ती स्वीकारली असून मंगळवार दि. 27 रोजी मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले, तक्रारदाराविरोधातील तीन अपत्त्याबाबतीतील शासकीय पुरावे तसेच उच्च न्यायालयाचे दाखले हरकत घेताना जोडण्यात आले होते. पण न्यायालयाचे दाखले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विचारात घेतले नाहीत. कोणत्यातरी पक्षासाठी ते काम करत असतील तर ही बाब लोकशाहीसाठी फार गंभीर आहे. घटनात्मक संस्था धोक्यात आणण्याचे काम यातून झाले आहे. त्यांनी एकतर्फी निकाल देताना कायद्याला बगल दिली आहे. एवढेच नव्हे तर निकालाला विलंब करून न्यायालयात जाण्यापासूनही रोखण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का? ते कोणत्या एका पक्षाचे काम करत आहेत का ? असे प्रश्न उपस्थित झाले असल्याचे ॲड. पाटील म्हणाले.
निकाल देताना जाणीवपूर्वक विलंब ..
सागर शिवदास यांच्या उमेदवारी अर्जावर मोहन जानराव यांनी वकिलांमार्फत दुपारी हरकत घेतली. पुरावे सादर केले. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले, या पुराव्यांची शहानिशा करून निकाल देतो. मात्र त्यांनी लवकर निकाल दिला नाही. ज्या उमेदवारावर हरकत घेण्यात आली होती त्यांची कागदपत्रे आमच्या वकिलांना देतानाही विलंब केला. पाच वाचता निकाल देतो असे सांगितले, त्यावेळीही दिला नाही. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांनी निकाल दिला नाही. यानंतर अचानक ‘तो ’उमेदवारी अर्ज अवैध करण्याचा अधिकार मला नसल्याचा निकाल दिला. तसेच न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे याबाबतीतील कामकाज संशयास्पद असल्याचा आरोप शंकरराव खापे यांनी केला.
जिवंत मुलीला कागदोपत्री मारण्याचे पाप..
तीन अपत्ये असल्याचे पुरावे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर आमच्या वकिलांनी सादर केले. यावर विरोधी उमेदवाराने एक मुलगी मयत झाल्याचे खोटे कागदपत्र सादर केले. दुर्दैवाची बाब म्हणजे ती मुलगी जिवंत असताना केवळ उमेदवारी टिकावी म्हणून तिला कागदोपत्री मयत शाबित करणे म्हणजे मोठे पाप आहे. भाजप उमेदवाराचा हा प्रकार निंदनिय असल्याचे प्रशांत यादव म्हणाले.