

सातारा : मत्त्यापूर (ता. सातारा) येथील उसाच्या शेतात आढळलेल्या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे तोडले आहेत. त्यामुळे या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की त्याचा घात झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. वन विभागाने घटनेचा पंचनामा, बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. मात्र, बिबट्याची हत्या झाली असावी या संशयातून वन विभागाने तपास सुरू केला आहे.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. विशेष म्हणजे या बिबट्याचे चारही पंजे कापून वेगळे करण्यात आले असून, एकूण 18 नखे गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बिबट्याचे दात आणि मिशा सुस्थितीत असल्याने या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.
दरम्यान, बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र चारही पाय कापण्यात आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याची नखे तस्करीसाठी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने वापरण्यात आली का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेमुळे मत्त्यापूर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांवरील वाढते हल्ले आणि बेकायदेशीर शिकारीच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.