कराड : महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागात एक गंभीर विसंगती समोर आली आहे. 2005 सालापासून राज्यातील शाळांमध्ये संगीत व चित्रकला शिक्षकांची नियमित भरती झालेली नाही आणि आता तर ‘पवित्र पोर्टल’द्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतही ही दोन्ही पदे पूर्णपणे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान मिळणे अवघड झाले आहे.
राज्यात हजारो विद्यार्थ्यांचा कला व संगीत विषयांतील नैसर्गिक कलागुण वाढवण्याचा हक्क गेल्या दोन दशकांपासून दुर्लक्षित राहिला आहे. एटीडी, बीएफए, बीपीए, एमए (म्युझिक, आर्ट) अशा पात्रता असलेले हजारो उमेदवार भरतीची वाट पाहत आहेत. मात्र शासनाकडून यावर कोणताही स्पष्ट निर्णय घेतला गेलेला नाही. काही शाळांमध्ये स्वयंसेवी किंवा कंत्राटी पध्दतीने या विषयांचे अध्यापन केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (एनईपी 2020) नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, संगीत, नाट्य, हस्तकला अशा सृजनात्मक विषयांना महत्त्व देण्यात आले आहे.
परंतु महाराष्ट्रात त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणार्या शिक्षकांची भरती केली जात नाही, ही मोठी विसंगती असल्याची टीका शिक्षण तज्ज्ञांकडून होत आहे. या संदर्भात विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी शिक्षण विभाग, शिक्षणमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदने सादर केली आहेत. अनेक उमेदवारांनी सामाजिक माध्यमांवरून आवाज उठवला आहे. मात्र तरीही राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. हे फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच नव्हे, तर एकूणच शैक्षणिक संस्कृतीसाठी धोका ठरू शकतं.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जातात. या शाळा सर्व खर्च मुलांकडून मिळणार्या फीमधून भागवत असतात. तसेच सर्व विषयांचे शिक्षण देतात. क्रीडा तसेच संगीत विषयाचे ज्ञानही देत असतात. त्यामुळे पालकांचा ओढा या शाळांकडे वाढत आहे.