

गणेशचंद्र पिसाळ
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. वन्य प्राण्यांपासून होणारे शेती नुकसान, मानवी व पाळीव जनावरांवरील हल्ले, पर्यटनाची लागलेली वाट, पर्यावरण पूरक प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या समस्या आदी अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे गरजेचे आहे. सध्याची स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता राज्याचे पर्यटन मंत्री, शिवसेनेचे (शिंदे गट) शंभूराज देसाई हे विधानसभा मतदारसंघाचे नेते आहेत. तर सत्यजितसिंह पाटणकरांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्यावरही मर्यादा येणार आहेत. या सत्ताधारी महायुती घटक पक्षांमुळे स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठी शासन, प्रशासनाच्या विरोधात यापुढे नक्की कोण आणि कसा आवाज उठवणार याबाबतच जनतेमध्ये संभ्रम आहे.
मुळातच भूकंप, अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्ती मतदारसंघाच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. एका बाजुला अशा नैसर्गिक आपत्ती असतानाच दुसरीकडे शासन, प्रशासनानेही कृत्रिम आपत्ती निर्माण केल्या आहेत. इतरांच्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्थानिकांच्या बोकांडीवर बसवून वर्षांनुवर्षे आपल्या पोराबाळांप्रमाणं जपलेल्या जंगलांवरच येथे पर्यावरण पूरक कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन अशा प्रकल्पातून कमालीचे कडक कायदे, निर्बंध, नियम, अटी लादल्याने स्थानिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. वन्य प्राण्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात हैदोस घातला आहे.
पारंपरिक, बारमाही पिकं घ्यायला शेतकरी धजवत नाहीत. ऊस,गहू, हरभरा, ज्वारी,भुईमूग,भात,सोयाबीन, फळबागा, भाजीपाला आदी पिकांवर वन्यप्राणी धुडगुस घालतात आणि शेतकर्यांच्या हातात कांहीच मिळत नाही. एका बाजूला वन्य प्राण्यांकडून शेती नुकसान होत असताना पाळीव दुभत्या जनावरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्णपणे स्थानिक नेते,शासन व प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहील, अशा संतप्त भावना आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस, मनसेसह राष्ट्रवादी शरद पवार गटाला संधी..
पाटण मतदारसंघाचं पारंपारिक राजकारणात नेहमीच पाटणकर व देसाई या दोन घराण्यातच गुरफटलेलं आहे. सुरूवातीपासूनच येथे एकतर पाटणकर नाहीतर देसाई यांनीच आत्तापर्यंत कायम सत्तास्थाने भूषवली. सत्ताधारी व विरोधक या भूमिकेत अनेकदा या मान्यवरांचे पक्ष बदलही झाले मात्र पारंपारिक राजकीय लढाई जैसे थेच राहिली आहे. सध्या ना.देसाई शिवसेना शिंदे गटात तर पाटणकर भाजपात गेल्याने येथे महायुतीची ताकद वाढली आहे. त्याचवेळी विरोधी पक्ष म्हणून फार मोठी स्पेस निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कसा उचलतो आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी कशा पद्धतीने लढा देतो यावरच तालुक्यातील जनसामान्यांच्या अपेक्षा आणि उपेक्षा अवलंबून राहणार आहेत.