

कराड : बोटिंग बंद असल्याने कोयनानगरची पेठ ओसाड पडली आहे. पाटण तालुक्यात बेरोजगारी निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. डोंगरी विभागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांच्याकडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना देखील त्याबाबत कोणीही आवाज उठवायला तयार नाही.
शेतकर्यांना नुकसानीची भरपाई मिळत असली तरी ती तुटपुंजी आहे. तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नुसत्याच घोषणा झाल्या. गत दहा वर्षांत पाटण तालुक्याची अधोगती झाली आहे, अशी टीका सत्यजितसिंह पाटणकर यांनी नाव न घेता ना. शंभूराज देसाई यांच्यावर केली. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, भाजपा हा देशातीलच नव्हे तर जगातील एक नंबरचा पक्ष आहे. पाटण तालुक्यातील रखडलेले कामे मार्गी लावण्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून आम्ही भाजपाबरोबर गेलो आहे. तालुक्यात अनेक विकास कामे रखडलेली आहेत. शेतकर्यांचे प्रश्न, व्याघ्र प्रकल्पासंदर्भातील प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न यासह विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भाजपाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहे.
नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली 250 गावे प्रकल्पात घेतले आहेत. या गावात एम एस आर डी सी ने आरक्षण टाकले असून ते आरक्षण काय आहे हे सुद्धा स्थानिकांना माहीत नाही. भाजपच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे. त्याचवेळी तेथील माणूस जगला पाहिजेत. शेती राहिली पाहिजे, यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.यापुढील कालावधीमध्ये सत्तेत दोन्ही पक्ष एकत्र असले तरी वरिष्ठ जो आदेश देतील त्यानुसार यापुढील वाटचाल राहील.
पाटण तालुक्यातील लोकांची विकासाची भूक अजूनही आहे. यापूर्वी विक्रमसिंह पाटणकरांच्या कालावधीमध्ये विकास झाला. परंतु गत दहा वर्षांमध्ये म्हणावा तसा विकास झाला नाही. विकास ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. अजूनही तालुक्यात विकास कामे करण्यासारखी बरीच आहेत. रोजगाराच्या शोधासाठी मुंबईला जाणारे लोंढे थांबविण्यासाठी तालुक्यात मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. आणि ते काम भाजपच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे हिंदुराव पाटील यांनी सांगितले.