

सणबूर : पाटण तालुक्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत तीन दशकांचा राजकीय प्रवास केलेले माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तालुक्यातील समीकरणे बदलतील, अशी चर्चा होती. परंतु सहा महिन्यांनंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहता पाटणकर आक्रमक होऊन कार्यशील झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील गटाचे महत्त्व सातत्याने वाढत आहे.
भाजप प्रवेशानंतर पाटणकर गटाकडून अपेक्षित अशी लाट उमटेल अशी अपेक्षा होती. उलट दहा गावांतील (रामनगर, लोकरेआळी, बादेवाडी, पुजारी मंडळ, कवरवाडी, चोरगेवाडी, शेंडेवाडी, मोरेवाडी, महिंद, बनपूरी, कुसवडे पुनर्वसन, नाटोशी) तब्बल 250 ते 300 कार्यकर्त्यांनी नाराज होऊन शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे पाटणकर गटाला भाजपा प्रवेशानंतरही पक्ष वाढीसाठी संषर्घ करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकांमध्येही पाटणकर गटाच्या महत्त्वाच्या सोसायट्या देसाई गटाकडे गेल्या.
भाजप प्रवेशानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ठोस विकासकामे किंवा पक्षवाढीसाठी प्रभावी कार्यक्रम दिसून आलेले नाहीत. भाजप हा सत्ताधारी पक्ष असून केंद्र आणि राज्यात सत्ता असताना देखील पाटण तालुक्यात त्या शक्तीचा लाभ मिळाल्याचे ठोस उदाहरण दिसत नाही. त्यामुळेच अनेक गावांमध्ये पाटणकरांचा प्रवेश हा तारक की मारक? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात देसाई गटाचा प्रभाव प्रचंड आहे. शंभूराज देसाई यांनी सातत्याने संपर्क ठेवल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत आहे. सोसायट्या, बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांत देसाई गटाची पकड मजबूत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये देसाई गटाने पाटणकर गटाला वारंवार धक्का दिला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या विधानसभेच्या रंगीत तालीम मानल्या जातात. यात जर पाटणकर गटाला आणखी पराभव पत्करावा लागला, तर त्यांची ताकद आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे कमी होऊ शकते. उलट देसाई गट आपली ताकद वाढवत गेला तर पाटण तालुक्यातील एकहाती नेतृत्व शंभूराज देसाई यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज पाटण तालुक्यातील जनतेमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई गट म्हणजे विकास आणि हमी यामुळे देसाई गटाचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. येणार्या निवडणुकांमध्ये हा ओघ कायम राहिला आणि सत्यजित पाटणकर गट कार्यशील झाला नाही, तर तालुक्याच्या राजकारणात याचा फायदा देसाई गटाला मिळून देसाई गट आणखी भक्कम होऊ शकतो, असेही जाणकारांमधून बोलले जात आहे.
देसाईंचा गाव तेथे विकास फॉर्म्युला...
पालकमंत्री शंभूराज देसाई गेली अनेक वर्षे तालुक्याच्या संपर्कात राहून प्रत्येक गावात विकासकामे राबवत आहेत. गाव तेथे विकास, आणि नेता तेथे उपस्थिती ही त्यांची शैली कार्यकर्त्यांना भुरळ घालते. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सोयी, मंडई, मंदिर विकास, आरोग्य सुविधा - या सर्व पातळ्यांवर देसाई गटाने प्रत्यक्ष कामे करून दाखवली आहेत. त्यामुळे सामान्य मतदार आणि कार्यकर्ते विकासाची हमी म्हणजे देसाई या विचाराने अधिक जोडले जात आहेत.