

मारूल हवेली : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या 30 लाख 32 हजार 541 रुपयांच्या अपहार प्रकरणी बुधवार दि.14 रोजी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सचिव हरिष बंडू सूर्यवंशी (रा. पाटण, जि. सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर संस्थेचे तत्कालीन सभापती, उपसभापतींसह अन्य 15 संचालक व 3 कर्मचारी अशा एकूण 21 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक रमेश किसन बागुल यांनी दिली आहे. या घटनेने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याबाबत लेखापरीक्षक रमेश किसन बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज लेखा परीक्षण मल्हारपेठ (ता. पाटण, जि. सातारा) येथे दि. 11 जुलै 2024 ते दि. 30 ऑक्टोबर 2024 या दरम्यान केले आहे.
या बाजार समितीच्या मालकीचे मौजे तारळे व मानेगाव येथे दोन पेट्रोल पंप आहेत. या दोन्ही पेट्रोल पंपाचे किर्द खतावणी ताळेबंद पहाता तारळे येथील पेट्रोल पंपाच्या व्यवहारात 8 लाख 43 हजार 771 रूपये तर मानेगाव येथील पेट्रोल पंपाच्या व्यवहारात 21 लाख 88 हजार 771 असे मिळून 30 लाख 32 हजार 541 रक्कमेबाबत काही स्पष्ट खुलासा केलेला नाही. त्यामुळे तारळे पेट्रोल पंप व मानेगाव पेट्रोल पंप येथील एकूण हातावरील रोख शिल्लक, व्हाउचर रक्कम, मागील स्टॉकमधील फरकाची रक्कम असे एकूण 30 लाख 32 हजार 541 रूपये ठेवलेली दिसून येते.
सदरच्या रक्कमेची तत्कालीन संचालक मंडळाने पडताळणी करणे आवश्यक होते. त्यांनी दि.1 एप्रिल 2021 ते दि. 22 एप्रिल 2022 या कालावधीत कधीही पडताळणी करण्याचे कर्तव्य जाणून बुजून केले नसल्याचे दिसले आहे. तसेच दि.22 एप्रिल 2022 ते दि. 31 मार्च 2023 पर्यंत पाटण बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक असल्याने त्यांचा आर्थिक व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याने या दोन्ही पेट्रोल पंपावरील सदर रक्कम आजपर्यंत बाजार समितीच्या बँक खात्यावर भरणा झालेली नाही. त्यामुळे संबंधितांनी संगनमत करून स्वत:च्या आर्थिक लाभासाठी अपहार केल्याचे दिसून आल्याने माझी तक्रार आहे. अधिक तपास स.पो.नि. चेतन मछले करत आहेत.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
तत्कालिन सभापती रेखा दादासो पाटील (रा.निसरे), उपसभापती अभिजीत शंकरराव जाधव (रा.तारळे), संचालक अरविंद पांडुरंग जाधव (रा.लेंढोरी), अधिक मारुती माने ( रा.मानेगाव), सुहास जगन्नाथ माने (रा. राहुडे), राजाराम मारुती मोरे (रा. जांभुळवाडी, कुंभारगाव), सुभाष बाबुराव पाटील (मंदुळ कोळे), शहाबाई सखाराम यादव, (रा.गारवडे), शंकर हैबती सपकाळ (रा.मालदान), श्रीरंग शामराव मोहिते (रा.बनपुरी), उत्तम सखाराम जाधव (रा.सणबूर), आनंदा परशराम डुबल (रा.आडुळ), सिताराम ज्ञानदेव मोरे (रा.डोंगळेवाडी), रामदास परशराम कदम (रा.नाडोली), शरद विश्वनाथ राऊत (रा.पाटण), आनंदराव सिताराम पवार (रा.मल्हारपेठ), जगन्नाथ विठ्ठल जाधव (रा.मेढोशी), सचिव हरिष बंडू सुर्यवंशी (रा.पाटण), तारळे पेट्रोल पंप विभागप्रमुख राजेंद्र भगवान पवार (रा.मल्हारपेठ), मानेगाव पेट्रोल पंप विभागप्रमुख दिलिप महादेव उदुगडे (रा.नवसरी) व राजाराम रामचंद्र नाईक (रा.मानेगाव) यांनी संगनमत करून सदरच्या रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे.