Satara News : पाण्याअभावी खरीप पिकांची होरपळ

पाटण तालुक्यात खरीप पिके धोक्यात; पावसाळ्यात उन्हाचा तडाखा
Satara News : पाण्याअभावी खरीप पिकांची होरपळ
Published on: 
Updated on: 
धनंजय जगताप

मारूल हवेली : पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटत आले तरी पाटण तालुक्यात अपेक्षित दमदार पाऊस झालेला नाही. गेल्या महिन्यापासून पावसाने पूर्णतः उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले, तरी पावसाऐवजी जोरदार वारे सुटत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा मावळत आहेत. त्यामुळे पावसाळ्यातच उन्हाच्या झळा आणि करपणाऱ्या पिकांचा मळा, अशी स्थिती तालुक्यातील अनेक भागांत निर्माण झाली आहे.

पाटण तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने अपेक्षित सातत्य न ठेवल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली असून, फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असताना पाऊस गायब झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खरीप पिकांना मोठा फटका

तालुक्यातील डोंगराळ तसेच पावसावर अवलंबून असलेल्या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, मका, ज्वारी यांसह विविध खरीप पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. काही ठिकाणी पिके तग धरून असली तरी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास ही पिकेही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र ऐन उत्पादनाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने पिकांचा खर्च तरी निघेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पावसाचा खंड वाढत चालल्याने तालुक्यातील विहिरी, कूपनलिका आणि लहान जलस्रोतांच्या पाणीपातळीतही घट होत आहे. पावसावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिकांना पाणी देण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यातील नदी, ओढे, बंधारे आणि जलसाठ्यांवर अवलंबून असलेल्या भागातील काही पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news