Satara illegal mining: पाटण; गौण खनिजातून पर्यावरणावर घाला

कोट्यावधींचा महसूल 'माती'त की खिशात ?; उच्चस्तरीय चौकशींची मागणी
Satara illegal mining: पाटण; गौण खनिजातून पर्यावरणावर घाला
Published on
Updated on
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : पर्यावरणासाठी अती संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातच पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी सुरू आहे. बदल्या, चौकश्यांची भीती आणि बढतीच्या अभिलाषेपोटी हाताची घडी तोंडावर बोट एवढ्यावरच न थांबता अधिकारीच राजकीय दलाल बनत असल्याचे आरोप होत आहेत. पर्यावरण रक्षणाची'माती' झाल्याने या अन्यायाविरुद्ध आवाज कोण उठवणार हाच प्रश्न आहे. प्रशासकीय यंत्रणा मुग गिळून गप्प का असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिका विचारत आहेत.

पाटण तालुक्यात गौण खनिज बंदी आवश्यक असून पर्यावरण पूरक कायदे, निर्बंध, नियम व अटींचा विचार करता बहुतांश नदीकाठ, भूस्खलन, भूकंपप्रवण क्षेत्र, शेती आदी ठिकाणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन झाले आहे. कोयना, मोरणा,पाटण, मल्हारपेठ आदी सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू असते. बेकायदा उत्खननामुळे नदीपात्रतही धोकादायक झाल्याने त्याचा स्थानिक शेतकरी, लोकवस्तींना फटका बसत असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

गौण खनिज उत्खननासाठी अनेक विभागांचे ना हरकत दाखले आवश्यक असतानाही यात कित्येकदा पळवाटा काढल्या जातात. काही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बनावट व परस्पर स्वाक्षऱ्या करून ना हरकत दाखले दिल्याच्याही तक्रारी असतात. याबाबत प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियावरही प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली जात असताना ठोस कारवाया का होत नाहीत हा संशयाचा विषय आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत पाटण तालुक्यात वीटभट्टीच्या माध्यमातून पंचवीस हजारांहून अधिकांच पोट भरत होतं. गेल्या काही वर्षांत पर्यावरण व नियमांचा बागुलबुवा व परवान्यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक लक्षात घेऊन अनेकांनी हा उद्योगच बंद केल्याने हजारोंचा रोजगार बुडाला. याचे कोणतेही सोयरसुतक नसलेल्या यंत्रणांनी याचाच गैरफायदा उठवत मुठभर धनिकांच्या सहाय्याने गोरगरिबांचा घास हिसकावत पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बेकायदा उत्खनन झालेल्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कडक कारवाया करण्याची सार्वत्रिक मागणी होत असली तरी याबाबत कोणतीही धाडसी भूमिका घेतली जात नाही. गौण खनिज उत्खननातून होणारी लूट तालुक्याला शेती, महापूर व पर्यावरणाच्या दृष्टीने खिळखिळी करणारी व स्थानिक रोजगार, व्यवसाय व उदरनिर्वाह पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी ठरत असल्याने या उत्खनन रॅकेटची उच्चस्तरीय चौकशीतून पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर नदीकाठावरील व शेतातील तांबडी माती मोठ्या प्रमाणात काढली जाईल. यातून पर्यावरणाची हाणी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news