

तारळे : जळव, ता. पाटण येथील घाटात एका अवघड वळणावर लालमाती वाहतूक करणारा ट्रक समोरुन आलेल्या एसटीला घासला. शनिवारी तारळेचा आठवडी बाजार असून खचाखच भरलेली एसटी जळवकडे जाताना दुपारी चारच्या दरम्यान हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून एसटी चालकाने प्रसंगावधान राखून एसटीवर नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
या अपघातामुळे घाटातील रहदारी बराच वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला व वाहतूक सुरळीत केली. तारळे वरून पाटणला जाण्यासाठी तारळे- सडावाघापूर-पाटण व तारळे -जळव - पाटण असे दोन मार्ग आहेत. दोन्ही रस्ते घाट मार्गाने आहेत. जळव परिसरामध्ये सध्या अदानी कंपनीचा प्रोजेक्ट सुरू आहे. तिथूनही माती उचलली जात असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात काळकुटवाडी गावानजिक लाल माती वाहतूक करणारा ट्रक अवजड वाहतुकीमुळे अपघात ग्रस्त झाला होता. दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिवस रात्र सुरू असलेली वाहतूक नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शनिवारी दुपारी चारच्या आसपास तारळे वरून पाटणला जळवमार्गे एसटी निघाली होती. खडकाचं पिळण नावाच्या शिवारात एका अवघड वळणावरून एसटी जात असताना जळवकडून लालमाती घेऊन ट्रक घाट उतरत होता. यावेळी ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो एसटीला उजव्या बाजूने घासत गेला. यावेळी बाजारासाठी आलेले परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर एसटीत होते. अचानक काय घडतय हे प्रवाशांच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर मात्र प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला. एसटी चालकाने प्रसंगावधान रखत एसटीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळला.