

पाचगणी : पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पाचगणी आणि परिसरातील गावांना सध्या कचर्याच्या समस्येने ग्रासले आहे. रस्त्यांच्या कडेला, ओढ्या-नाल्यांजवळ आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या नंदनवनाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. व्यावसायिक आणि काही ग्रामस्थांच्या बेजबाबदारपणामुळे ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाचगणी परिसरातील गावांमध्ये वाढते नागरिकरण आणि पर्यटन हंगामात होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी यामुळे कचरा निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या कचर्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने गावांच्या वेशीवरच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः पाचगणी ते महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर पांगरी गावच्या हद्दीत अंजुमन शाळेसमोर कचर्याचे ढीग नित्याचेच झाले आहेत. एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियाना’चा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे पर्यटनस्थळांची ही दुरवस्था व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देत आहे.
अनेक हॉटेल्स, लॉजेस आणि व्यावसायिक आपला कचरा रात्रीच्या वेळी किंवा निर्जन ठिकाणी सर्रासपणे टाकत असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायती कचरा गोळा करण्याची मोहीम राबवत असल्या तरी, गोळा केलेल्या कचर्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा कचरा पुन्हा गावाबाहेरील मोकळ्या भूखंडांवर टाकला जातो, ज्यामुळे मूळ समस्या कायम राहत आहे. ग्रामपंचायतींची अपुरी देखरेख आणि व्यावसायिकांमधील जबाबदारीचा अभाव यांमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. प्रशासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास पाचगणी परिसराची ओळख पुसली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.