

पाचगणी : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे विस्तीर्ण पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेबल लँडवर सध्या निसर्गाने रंगांची उधळण करण्यास सुरुवात केली आहे. हिरव्यागार गवतामधून पांढऱ्या रंगाची गोलसर गेंदफुले डोकावू लागली आहेत. काही ठिकाणी जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या रानफुलांनीही आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. उंच पर्वतरांगा, दाट धुके, हिरव्यागार गवताचे गालिचे आणि त्यातून डोकावणारी रंगीबेरंगी रानफुले यामुळे टेबल लँडचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
पावसाळ्यातील अनुकूल वातावरणामुळे टेबल लँड परिसरातील गवत आणि विविध वनस्पतींना बहर आला आहे. त्यातून उमलणाऱ्या रानफुलांमुळे पठाराच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात फुलांवर चमकणारे पाण्याचे थेंब, सभोवतालचे धुके आणि हिरवळीची साथ यामुळे हे दृश्य मन मोहून टाकत आहे. पठारावर फेरफटका मारताना अचानक गवतातून डोकावणारी छोटी-छोटी फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
टेबल लँडवरील फुलांचा बहर सुरू होताच फुलांच्या या बहराने पर्यटकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. कुटुंबासह आलेले पर्यटक, तरुणाई, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी फुलांच्या विविध रंगछटा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहेत. फुलांच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे काढण्याबरोबरच व्हिडिओ आणि रील्स बनवण्याची लगबगही सुरू आहे. अनेक पर्यटक काही क्षण फुलांच्या सान्निध्यात घालवत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत. सध्या फुलांच्या बहराची सुरुवात झाली असून आगामी काळात विविध रानफुलांच्या प्रजाती उमलल्यानंतर पठाराचे रूप आणखी रंगीबेरंगी होणार आहे.