

पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेले काम आणि खोदून ठेवलेला रस्ता यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरी शेतीवर मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. या धुळीचा फळांच्या गुणवत्ता, उत्पादन आणि बाजारभावावर परिणाम होत आहे. यामुळे पाचगणीच्या स्ट्रॉबेरीला धुळीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसानीच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
स्ट्रॉबेरी हंगाम सुरू असतानाच रस्त्याचे काम रखडल्याने वाहनांची वर्दळ कायम राहिली. त्यामुळे उडणारा धुरळा थेट शेतात जाऊन पिकावर साचत आहे. स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाजूक पीक असल्याने फळांच्या रंग, चव आणि आकर्षकतेवर धुळीचा परिणाम दिसून येत आहे. लागवड, मजुरी, खते, औषधे, पाणीपुरवठा व देखभाल यासाठी मोठा खर्च करूनही उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धुळीमुळे विक्री योग्य फळांचे प्रमाण कमी झाले असून काही ठिकाणी फळांवर धुळीचे थर बसल्याने ती स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त मजुरी खर्च करावा लागत आहे. हंगामातच रस्ता खोदल्याने आमचे मोठे नुकसान झाले, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पाचगणी व महाबळेश्वर परिसर हा राज्यातील प्रमुख स्ट्रॉबेरी पट्टा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येऊन ताजी स्ट्रॉबेरी खरेदी करतात. मात्र, यंदा मुख्य रस्त्यावरील रखडलेल्या कामामुळे धुळीची समस्या निर्माण झाली असून शेतकऱ्यांना उत्पादन घट व तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी रस्त्याचे काम पूर्ण करावे, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी करावी आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.