सातारा : शालेय कामकाज व विद्यार्थी विकास व सुरक्षितेसाठी विविध प्रकारच्या 15 समित्या स्थापन करण्यात येतात. तर महाविद्यालय स्तरावर अँटी रॅगिंग कमिट्या स्थापन असतात. तरी देखील कुठे रॅगिंग तर कुठे मानसिक शोषणाच्या घटना घडत आहेत. पाचगणीतील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगच्या घटनेने अवघे समाजमन पुन्हा एकदा हेलावले आहे. होस्टेलमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. पालकांमध्ये धास्ती वाढली असून महाविद्यालयांप्रमाणेच शाळा स्तरावर तसेच हॉस्टेलमध्येही अॅण्टी रॅगिंग कमिट्या अॅक्टीव्ह करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिक्षण व करिअरमध्ये स्पर्धा वाढल्याने आपल्या पाल्याला उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळावून देण्याकडे पालक वर्गाच कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दर्जात्मक शिक्षण व चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधा मिळण्यासाठी ग्रामीण भागातील मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. उच्च व व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परीक्षांबरोबर शालेय शिक्षणासाठीदेखील अनेक विद्यार्थी परगावी, काही हॉस्टेल तर काही रुम घेवून राहतात. मागील आठवड्यातील ठाणे जिल्ह्यातील एका शाळेत मुख्याध्यापक व स्वच्छता कर्मचार्यांकडून मुलींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याने पालक वर्गामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
हे प्रकरण ताजे असतानाच जिल्ह्यातही पाचगणीतील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्याच वर्गातील मुलांवर रॅगिंगची घटना समोर आल्याने अवघे समाज मन हेलावले आहे. हॉस्टेलवर किंवा शिक्षणासाठी बाहेर राहणार्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज परगावी राहणार्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बरेच दिवस आई वडिलांच्या सुरक्षा कवचात राहिलेली मुलं बाहेरच्या जगात वावरताना कितपत सुरक्षित राहतील, याची काळजी पालकांमध्ये असते. बर्याचदा घरातही, नात्यातील व्यक्तींकडूनही शोषण किंवा अन्याय होत असतो. सहन करत राहिल्यास अन्याय वाढतो. त्याला पायबंद घालण्यासाठी वेळीच अन्याय किंवा अत्याचाराविरोधात व्यक्त झाल्यास कारवाई करणे शक्य होते. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याबरोबर सुसंवाद ठेवला पाहिजे.