

सचिन टक्के
पाचगणी : साहसी क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक ठरलेली ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2026’ ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाचगणी येथे मोठ्या दिमाखात पार पडली. युरोपियन देशांमध्ये प्रामुख्याने आयोजित होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन प्रथमच भारतात, तेही पाचगणीत झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. या स्पर्धेने पाचगणीला जागतिक ओळख दिली.
या स्पर्धेचे आयोजन इव्हेंट डायरेक्टर इंडिया कृष्णकांत भागरा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी चे चेअरमन अनुपम जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आले. उत्कृष्ट नियोजन, सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन यामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या वर्ल्ड कपमध्ये जगातील 25 देशांतील 130 हून अधिक नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतला. विविध देशांचे पायलट पाचगणीच्या आकाशात झेपावताना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचे परीक्षण पॅराग्लायडिंग वर्ल्डकप असोसिएशनचेे अध्यक्ष गोरान आणि आंतरराष्ट्रीय पंचांच्या उपस्थितीत झाले. ज्यामुळे स्पर्धेला अधिकृत जागतिक मान्यता मिळाली.
स्पर्धेत प्रत्येक पायलटला 80 ते 100 किलोमीटर अंतर निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आले होते. हवामान, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांचा अचूक अंदाज घेत ग्लायडरसह उड्डाण करणे ही मोठी कसोटी होती. सुमारे 25 किलो वजनाचे उपकरण घेऊन चार तासांहून अधिक काळ हवेत स्थिर राहून निर्धारित मार्ग पूर्ण करावा लागत होता. या वर्ल्ड कपमुळे पाचगणीचे नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी पर्यटन क्षमता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. सोशल मीडियासह आंतरराष्ट्रीय माध्यमांतून स्पर्धेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने पाचगणीची ओळख एक सक्षम साहसी क्रीडा केंद्र म्हणून अधिक बळकट झाली आहे. या स्पर्धेमुळे पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार क्षेत्राला चालना मिळणार आहे.