

सचिन टक्के
पाचगणी : पाचगणी पालिकेच्या निवडणुकीत भावकीमध्येच झालेल्या संघर्षाचा फटका कऱ्हाडकर गटाला बसला. ना. मकरंद पाटील यांचा करिष्मा व विकासकामांची मांडलेली जंत्री यामुळे राष्ट्रवादीच्या दिलीप बगाडेंना विजय मिळवता आला. कऱ्हाडकर गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष कांबळे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला असताना त्यांच्याच छोट्या बंधूंना मात्र 250 मते मिळाली. परिणामी संतोष कांबळे यांचा पालिकेतील प्रवेश रोखला गेला. याचबरोबर कऱ्हाडकर गटाच्या माजी नगरसेवकांनी प्रशासकीय कालावधीत पाचगणीकरांना वाऱ्यावर सोडल्याने राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली.
पाचगणी पालिकेत आजवर लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीने मात्र या वर्चस्वाला धक्का दिला. कऱ्हाडकर गटाने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. नगराध्यक्ष पदासाठी संतोष कांबळे यांना पाठिंबा दिला. सुरुवातीला त्यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, प्रत्यक्ष मतदारांनी सत्ताबदल करत राष्ट्रवादीच्या बगाडेंना साथ दिली. प्रशासकीय काळात नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, रस्ते, पाणी, स्वच्छता यावरून नागरिकांमध्ये नाराजी होती. ती दूर करण्यात लक्ष्मी कऱ्हाडकर या कमी पडल्या. तसेच नगराध्यक्षपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा? याचा उशिरा घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला.
संतोष कांबळे यांच्या पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मतांचे विभाजन. सुनील बगाडे, दीपक बगाडे, सुनील कांबळे आणि अमोल सावंत या अपक्ष उमेदवारांनी मिळवलेली मते निर्णायक ठरली. संतोष कांबळे यांचे लहान बंधू सुनील कांबळे यांना 250 मते मिळाली. संतोष कांबळे यांना 2669 मते मिळाली. हे दोघे सख्खे भाऊ एकत्र असते तरी कऱ्हाडकर गटाला नगराध्यक्षपद मिळवता आले असते. अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि भावकी-नातेसंबंधातील ताणतणाव निवडणुकीत स्पष्टपणे समोर आला. कुठे ‘भाऊ विरुद्ध भाऊ’, ‘सासरा विरुद्ध जावई’ अशा लढतींमुळे मतदार संभ्रमात पडला आणि त्याचा फटका थेट संतोष कांबळे यांना पर्यायाने कऱ्हाडकर गटाला बसला. निवडणुकीत यंदा राजकीय पक्षांइतकेच भावकी आणि भावबंदकीचे राजकारण निर्णायक ठरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत कऱ्हाडकर गटाकडून संतोष कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या उमेदवारीभोवती तयार झालेले भावकीतील मतभेद आणि घरातील राजकीय संघर्ष हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. याचाच अप्रत्यक्ष पण निर्णायक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार दिलीप बगाडे यांना झाला.
पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीने केवळ सत्ता बदलाचा नाही. तर राजकीय रणनीतींचा हिशोबही जनतेसमोर मांडला आहे. या निवडणुकीत कऱ्हाडकर गटाला भाजपाकडून मिळालेला कथित छुपा पाठिंबा त्यांच्यासाठी फलदायी ठरला नाही. हा छुपा पाठिंबा कऱ्हाडकर गटाला मतांची बेगमी करून देईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, पाचगणीसारख्या शहरात हा प्रयोग उलट ठरला. भाजपची प्रतिमा, राष्ट्रीय पातळीवरील राजकारण आणि स्थानिक मुद्यांपासून दूर गेलेली भूमिका यामुळे काही पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विशेषतः राष्ट्रवादीकडे झुकणारा मध्यमवर्गीय आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित मतदान करणारा घटक या छुप्या युतीमुळे दुरावल्याचे दिसून आले. याचाच थेट फटका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कांबळे यांना बसला. यामुळे निर्णायक क्षणी काही मते राष्ट्रवादीच्या बाजूने वळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दिलीप बगाडे यांनी संयमी आणि कमी आक्रमक राजकारण केले. राष्ट्रवादी काँग्रेसची बांधिलकी, सर्वसामान्यांशी असलेले संबंध आणि शांत स्वभाव ही त्यांची मोठी ताकद ठरली. कोणत्याही गटावर थेट टीका न करता त्यांनी ना. मकरंद आबांनी पाचगणीसाठी केलेल्या विकासकामांची जंत्री जनतेसमोर मांडली. तसेच शहराच्या विकासाचा रोडमॅप जनतेसमोर प्रभावीपणे मांडला. त्यामुळे अवघ्या दोन मतांच्या फरकाने बगाडे यांनी बाजी मारली. त्यांनी योग्य वेळी मतदारांची मानसिकता ओळखून डावपेच टाकले. त्यामुळेच राष्ट्रवादीला घवघवीत यश आले.