

पाचगणी : पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे वायरमन आज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शहरासह ग्रामीण परिसरातील अनेक ठिकाणी महावितरणचे कर्मचारी तब्बल 30 ते 40 फूट उंच विद्युत पोलावर कोणतीही पुरेशी सुरक्षा साधने नसताना चढून काम करताना दिसत आहेत. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, ग्लोव्हज, सेफ्टी रोप यांसारखी अत्यावश्यक साधने उपलब्ध नसल्याने प्रत्येक काम जीवघेणे ठरत आहे.
वादळी वारे, पाऊस किंवा रात्रीची वेळ असो, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांचा रोष टाळण्यासाठी वायरमनना तातडीने कामावर धाव घ्यावी लागते. मात्र, ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण शहराचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यांच्याच सुरक्षेबाबत महावितरण प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. अनेक वेळा वायरमन उंच पोलवर केवळ एका दोरीच्या आधाराने किंवा कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसताना काम करत असल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत एखादी छोटी चूक किंवा विद्युत धक्का थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकतो.
अनेक वायरमन हे कंत्राटी पद्धतीवर काम करत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. कमी मनुष्यबळ, सततच्या तक्रारी आणि वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करतात. काम नाकारले तर नोकरीची भीती आणि काम केले तर जीवाची भीती, अशी भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर शिडी किंवा हायड्रा वाहनाऐवजी थेट पोलवर चढून दुरुस्ती केली जात असल्याचे वास्तव आहे.
महावितरणकडून सुरक्षा नियमांचे पालन होत असल्याचे कागदोपत्री दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे दिसत आहे. एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होते, काही दिवस चर्चा होते आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वायरमनचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पाचगणीसारख्या डोंगराळ भागात विद्युत यंत्रणेची कामे अधिक धोकादायक मानली जातात. अरुंद रस्ते, उंच पोल, पावसाळ्यातील ओलसर वातावरण आणि जुन्या तारा यामुळे धोका अधिक वाढतो. तरीही अनेक ठिकाणी आधुनिक सुरक्षा उपकरणांचा अभाव दिसून येतो. कर्मचारी स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर काम करतात. मात्र, अनुभवाला मर्यादा असतात आणि निष्काळजीपणाची किंमत जीव गमावून चुकवावी लागू शकते.