

पाचगणी : पाचगणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहिले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. हिवाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाला सध्या अपेक्षित हवामान मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
ढगाळ वातावरणामुळे तापमानात अचानक चढ-उतार होत आहेत. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. याचा थेट परिणाम स्ट्रॉबेरीच्या फुळधारणा व फळधारणेवर होत आहे. अनेक ठिकाणी फुले गळून पडत असून तयार होणाऱ्या फळांचा आकार लहान राहतो आहे. तसेच फळांना अपेक्षित गोडवा, लालसर रंग व चमक न येण्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. आर्द्रता वाढल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा आणी किडीचा धोका अधिक वाढला आहे.
करपा, फळकुज, पानांवर डाग पडणे यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारण्या कराव्या लागत आहे. कीटकनाशके व औषधांच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. अनेपेक्षितपणे वाढलेला हा खर्च अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. चालू वर्षी पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा अधिक वाढल्याने स्ट्रॉबेरीची लागवड उशिरा झाली. पाऊस पूर्णपणे उघडल्यानंतरच लागवड करता येत असल्याने यंदा लागवडीला विलंब झाला.
स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख नगदी पीक आहे. अनेक कुटुंबांचे अर्थकारण पूर्णपणे याच पिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे पिकाचे नुकसान, उत्पादनात घट आणि बाजारपेठेतील दरातील अनिश्चितता असा तिहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खर्च वाढत असताना उत्पन्न घटत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.