Satara News : पाचगणीत गॅस तुटवड्याने व्यवसाय अडचणीत

हॉटेल, खाद्यपदार्थ व रेस्टॉरंटला फटका : अनेकांनी वेळा बदलल्या
Gas Supply
पाचगणीत गॅस तुटवड्याने व्यवसाय अडचणीत
Published on
Updated on

पाचगणी : पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या पाचगणी शहरात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल तसेच विविध खाद्य व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अनियमित होत असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, चहा-नाश्त्याची दुकाने, चणा विक्रेते, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे.

स्वयंपाकासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक आहे. पुरेशा प्रमाणात व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना व्यवसाय चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.

पाचगणी हे प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची ये-जा असते. पर्यटकांच्या मागणीनुसार हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये दिवसभर स्वयंपाक सुरू असतो. मात्र, गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने अनेक ठिकाणी स्वयंपाकघराचे नियोजन बिघडले आहे. काही हॉटेल व्यावसायिकांना जादा दराने इतर ठिकाणाहून सिलिंडर मिळवावे लागत आहेत, तर काहींनी व्यवसाय मर्यादित वेळेत चालवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यवसायाचा खर्च वाढत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान व्यावसायिकांना बसत आहे. चहा-नाश्त्याची दुकाने, चणा विक्रेते, बेकरी व्यावसायिक तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते रोजच्या उत्पन्नावर व्यवसाय चालवत असतात. गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास त्यांचा व्यवसाय थांबण्याची वेळ येत असल्याने अनेक लहान व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचे वितरणही काही ठिकाणी उशिरा होत आहे. नवीन नोंदणीनंतर सिलिंडर मिळण्यासाठी 25 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सींनी गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच प्रशासनानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅसचा नियमित पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news