

पाचगणी : मुंबईतील एका बड्या व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या धमकीच्या प्रकरणाचा छडा लावताना, पाचगणीजवळील गोडवली गावातून ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संशयित संबंध असलेल्या एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने (सीआययू) गुरुवारी नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले. मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, मूळ रा. जम्मू-काश्मीर, सध्या रा. गोडवली, ता. महाबळेश्वर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरातील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामाबाबत प्रशासनाला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून, प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना २१ मेपासून आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप क्रमांकांवरून सातत्याने धमक्या येत होत्या. याबाबत खत्री यांनी २२ जून रोजी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई गुन्हे शाखेला तांत्रिक विश्लेषणावरून पाचगणीतील गोडवली येथील धागेधोरे सापडले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन मोबाईलसह डायरी जप्त
मुंबई गुन्हे गुप्तचर पथकाने अचानक छापा टाकून त्याला राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन महागडे मोबाईल आणि एक डायरी जप्त केली आहे. मोबाईलमधील डिलिट केलेला मजकूर आणि डिजिटल डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी फॉरेन्सिक व तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.