

पाचगणी : दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई व पुण्याहून पर्यटक दाखल झाले आहेत. यामुळे टेबलटँडसह विविध पॉईंटस् व बाजारपेठेत पर्यकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते गजबजून गेले आहे.
दि. 3 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार असल्याने आणखी 4-5 दिवस पर्यटकांची रेलचेल कायम राहणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबलचक रांगा रस्त्यांवर दिसत आहेत. टेबललँड, पारसी पॉईंट, सिडनी पॉईंटवर पर्यटक गर्दी करत आहेत. घाटमाथ्यावरून खाली दिसणाऱ्या ढगांच्या हालचाली, रिमझिम पाऊस आणि धुक्याचा खेळ यामुळे निसर्गप्रेमी पर्यटक मंत्रमुग्ध झाले आहेत. फोटोसेशन, सेल्फी आणि थंड हवेत फिरणाऱ्या पर्यटकांची लगबग सर्वत्र जाणवत आहे.
पर्यटकांची वर्दळ वाढल्याने वाई ते पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पाचगणीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे आणि फार्महाऊस फुल्ल झाले आहेत. स्थानिक व्यावसायिक, फूड स्टॉल्स आणि चहा-भजी विक्रेत्यांचीही चांगली चलती सुरू झाली आहे.
मे महिन्यात चालू झालेल्या पावसाने अजूनही पाठ सोडली नसल्याचे चित्र पांचगणीकर अनुभवत आहेत. ऑक्टोबर हिट जाणवत असताना पावसाने हजेरी लावल्याने हवामान आल्हाददायक झाले आहे. दिवसाचं ऊन अधूनमधून डोकावत असलं तरी दुपारनंतर पुन्हा धुक्याची चादर शहराला वेढते आहे. दरम्यान, वाहतुकीवरील ताण लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.