

पाचगणी : जावली तालुक्यातील सावरी येथे मेफेड्रॉनचा साठा सापडल्याची घटना ताजी असतानाच, पाचगणी शहरात कोकेन तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पाचगणी शहर व परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या 10 जणांच्या टोळीला अटक करत त्यांच्याकडून कोकेनसद़ृश अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा एकूण 42 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोहम्मद नावेद सलीम परमार (वय 32), सोहेल हशद खान (35), मोहम्मद ओएस रिजवान अन्सारी (32), वासिल हमीद खान (31), मोहम्मद साहिल अन्सारी (30), जिशान इरफान शेख (31), सैफ अली कुरेशी (31), मोहम्मद उबेद सिद्दीकी (27),अली अजगर सादिक राजकोटवाला (30), रहीद मुख्तार शेख (31, सर्व रा. मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांविरुद्ध पाचगणी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 17 डिसेंबर रोजी पहाटे पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, पाचगणीतील घोडजाई मंदिर परिसरात कोकेनसदृश अमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाचगणी पोलिसांनी संयुक्तरीत्या सापळा रचला. पहाटे सुमारे 12.05 वाजण्याच्या सुमारास संशयित स्कोडा रॅपिड (एम.एच 02 डीएन 0259) व एम.जी. हेक्टर (एम.एच 01 डीके 8802) ही दोन वाहने आढळली. दोन्ही वाहनांची झडती घेतली असता त्यामधून कोकेन आढळले. पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीचा कोकेनसदृश अमली पदार्थ, मोबाईल हँडसेट व अन्य साहित्य जप्त केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरूण देवकर, सपोनि दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक पारितोष दातार, बालाजी सोनुने, पोलिस अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण पडतरे, उमेश लोखंडे, तानाजी शिंदे, विशाल पवार, रविंद्र कदम, श्रीकांत कांबळे, अमोल जगताप, गोकुळ बोरसे, सतीश पवार, विनोद पवार, ज्योती पोळ यांनी ही कारवाई केली.