

कराड : निवडणूक आयोग किती अक्षम्यतेने काम करतोय हे आपल्यासमोर आले आहे. मतदान झालेल्या नगरपालिकांचा निकाल आता 21 तारखेला लागणार आहे. म्हणजे जवळजवळ 16 ते 17 दिवस मतदान मशिन या कुठेतरी गोडावूनमध्ये ठेवल्या जातील. त्यामुळे त्या मशिनमध्ये काही गडबड करायचे असेल तर सरकारला भरपूर वेळ मिळेल, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या सर्व प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवरती जबाबदारी ढकलून रिकामं होत आहे. न्यायालयात केस सुरू होती त्यावेळेला सरकारच्या वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडायला हवी होती. तसे झाले असते तर निकाल पुढे गेले नसते. परंतु, ती बाजू मांडण्यामध्ये सरकारला अपयश आले आहे. आता त्याबाबत निवडणूक आयोगाला दोष देऊन काही उपयोग नाही. कारण हा निकाल न्यायालयाने दिला आहे.
निकाल पुढे ढकलण्याबाबतचे प्रकरण न्यायालयात गेले त्यावेळी सरकारी वकील झोपले होते का? असा संतप्त सवाल करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकारी वकिलांनी आम्हाला हे नको आहे, ताबडतोब निकाल द्या, असे म्हणून सरकारची बाजू मांडायला हवी होती. त्यामध्ये त्यांना अपयश आले आहे. आता त्याचे खापर ते निवडणूक आयोगावरती फोडत आहेत, हे बरोबर नाही. जोपर्यंत जनता जागृत होत नाही, तोपर्यंत हळूहळू हे असेच होत राहणार आणि या देशात लोकशाही नाही तर संपूर्णपणे हुकूमशाही आलेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले.