

कराड : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद असलेल्या एसटी महामंडळाकडे शेकडो बस आहेत. संबंधित बसमधून प्रत्येक मार्गावर प्रवाशांची वाहतूक केली जाते. मात्र, काही मार्गावर प्रवासी जास्त आणि एसटींची संख्या कमी, अशी परिस्थिती असल्यामुळे एसटीतून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करताना दिसून येतात.
वास्तविक, एसटीच्या प्रकारानुसार प्रवासी संख्या निश्चित आहे. मात्र, तरीही अनेक एसटीमध्ये प्रवासी उभे राहून लोंबकळत प्रवास करीत असल्याचे दिसते. मात्र, अशा एसटीवर अपवाद वगळता आरटीओकडून कारवाईच होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात दिसून येते.
जिल्ह्यात बहुतांश शाळांना एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्या. त्यामुळे अनेकजण पर्यटन तसेच गावी जाण्यासाठी बाहेर पडले. परिणामी, एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला. वाढत्या प्रवासी संख्येमुळे एप्रिल महिन्यात महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न झाले असून मे महिन्यात आजअखेर या उत्पन्नात भरच पडली आहे. जिल्ह्यात कराड आणि सातारा ही महामंडळाची मोठी आगार आहेत. या दोन्ही आगाराचे उत्पन्न जास्त आहे. या आगारातून स्थानिक गावे, वाड्यावस्त्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतात. त्यामध्ये पुणे, मुंबईला जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील प्रत्येक आगाराकडे एसटींची संख्या जास्त आहे. मात्र, मार्गानुसार एसटींचे व्यवस्थापन करताना अधिकार्यांना कसरत करावी लागत असल्याची परिस्थिती असून काही मार्गांवर प्रवासी जास्त आणि एसटी फेर्यांची संख्या कमी, अशी स्थिती आहे. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टीमुळे कराड आगाराने अनेक गावच्या एसटीच्या फेर्या कमी केल्या आहेत.