जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव; रुग्णालये हाऊसफुल्ल

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांतून संताप
Dengue Cases Increasing In Satara
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविकांकडून सर्व्हे सुरू असून, साठवून ठेवलेल्या पाण्यात आळ्या आढळून आल्याने संबंधित बॅरल रिकामे करण्यात आले.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली आहेत. संबंधित आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत.

जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अधूनमधून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिले असून, या पाण्यावर डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याकडे आरोग्य विभागासह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. बदलते वातावरण व वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, ताप, सर्दी, खोकला यासह अन्य आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. शासकीय रूग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल असून रूग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव

जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. त्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक डेंग्यूने आजारी आहेत. त्यामुळे खासगी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत याची शासकीय आरोग्य यंत्रणेकडे कोठेही नोंद नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा नेमकी काय काम करते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आरोग्य यंत्रणेने तात्काळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागात सर्वेक्षण करून किती रुग्ण डेंग्यूसह अन्य आजाराने आजारी आहेत त्याची माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सातारा शहर हॉटस्पॉट...

सातारा शहरातील मंगळवार पेठ, सदरबझार, लक्ष्मीटेकडी, आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, टायफाईडचे रुग्ण आढळून आले आहेत. सातारा शहरात विविध आजारांचा फैलाव वाढला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात दररोजचे 20 ते 25 रुग्ण डेंग्यूच्या लक्षणाचे आढळून येत आहेत. वैद्यकीय अधिकार्‍याकडून रक्त तपासणीवर भर दिला जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news