Organic jaggery: सेंद्रिय' गुळाबरोबर विक्रेतेही गायब

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेचा परिणाम
Organic jaggery: सेंद्रिय' गुळाबरोबर विक्रेतेही गायब
Published on
Updated on
अशोक मोहने

कराड : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. बनावट पनीर, निकृष्ट दूध, भेसळयुक्त मिठाई, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांवर सातत्याने छापे टाकून मोठ्या प्रमाणावर माल जप्त करण्यात येत आहे. या कारवाईचा परिणाम आता "सेंद्रिय" या नावाखाली विकल्या जाणाऱ्या गुळाच्या विक्रीवरही दिसून येत आहे.

कराडसह सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आठवडी बाजार, मुख्य बाजारपेठा आणि किराणा दुकानांमध्ये "सेंद्रिय गूळ" म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. नैसर्गिक, रसायनमुक्त आणि आरोग्यदायी असल्याचा दावा करून हा गूळ ग्राहकांना जादा दराने विकला जात होता. मात्र, अन्न भेसळीविरोधातील कठोर कारवाई सुरू झाल्यापासून अशा विक्रेत्यांची संख्या अचानक कमी झाली असून अनेक ठिकाणी सेंद्रिय गूळ मिळणेही बंद झाले आहे.

यामुळे या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने विक्री थांबवली असल्याची चर्चा बाजारात आहे. जर खरोखरच हा गूळ प्रमाणित सेंद्रिय आणि नियमांनुसार तयार केलेला असता, तर तो बाजारातून अचानक गायब होण्याचे कारण काय, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करत आहेत.

कृषी आणि अन्न क्षेत्रातील जाणकारांच्या मते, "सेंद्रिय" हा शब्द वापरण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र आणि निश्चित निकष पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, अनेक विक्रेते कोणतेही प्रमाणपत्र नसताना ग्राहकांची दिशाभूल करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उत्पादनांची प्रयोगशाळेत तपासणी करून सत्य समोर आणण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्राहकांनीही केवळ "सेंद्रिय" असा फलक किंवा पॅकिंग पाहून उत्पादन खरेदी करू नये असे शेती मित्र तसेच वैद्यकीय विभागाचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news