Makarand Patil | विरोधकांची अवस्था बडा घर आणि पोकळ वासा : ना. मकरंद पाटील
वाई : मतदारसंघाच्या बाहेरील लोकांनी विकासाच्या पोकळ गप्पा मारू नये. विकासनिधी प्रत्यक्षात किती दिला ते बोला. माझ्या मतदारसंघाची चिंता करू नका, मी समर्थ आहे. तुमची अवस्था बडा घर आणि पोकळ वासा अशी आहे. राष्ट्रवादीने पिसाळ कुटुंबाला मंत्रिपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद, कृषी सभापतीपद, कारखान्याचे संचालकपद आणि सूतगिरणीचे अध्यक्षपद दिले आहे. मी बोपेगावपेक्षा अधिक प्रेम आणि निधी बावधनला दिला आहे. अजित दादांच्या स्वप्नपूर्तीसाठी बावधन गटातून ऋतुजा शिंदे यांना साथ द्या, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
बावधन गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार ऋतुजा शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मदन भोसले, कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अरविंद कुदळे, संतोष पिसाळ, नितीन मांढरे, बाळासाहेब यादव, रमेश पिसाळ, रमेश भोसले व गणातील उमेदवार उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील पुढे म्हणाले, माझ्या मतदारसंघात येऊन विरोधक सातत्याने पोकळ आश्वासनांच्या गप्पा मारत आहेत. पण आजपर्यंत त्यांनी बावधन गावाच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिलेला नाही. खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे. ऋतुजा शिंदे म्हणाल्या, एकदा संधी द्या, बावधनकरांना अभिमान वाटेल असे काम करून दाखवेन. शेंदूरजणे आणि बावधन हा भेदभाव मी मानत नाही. जे मी त्या गणासाठी केले तेच पूर्ण गटासाठी करण्यासाठी माझ्यात ताकद आहे. पूर्ण मतदारसंघ म्हणूनच मी काम करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

