

सातारा : संसदीय शिष्टाचारानुसार आतापर्यंत जेवढी युद्धे झाली, त्याची इत्तंभूत माहिती तत्कालीन पंतप्रधानांनी संसदेचे अधिवेशन बोलावून दिली होती. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला अपवाद ठरले आहेत. माध्यमे पाकिस्तानातील हल्ल्याचे खोटे चित्र उभे करत आहेत. ही बोगसगिरी थांबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अधिवेशन बोलावून सर्वपक्षीय खासदारांना ’ऑपरेशन सिंदूर’ बाबतची माहिती द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र शासनाने ऑपरेशन सिंदूर राबविले. यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. युद्ध जिंकण्याच्या परिस्थितीत असताना कुणाच्या सांगण्यावरून पीछेहाट घेतली गेली, हा प्रश्न आहे. भारताची विमाने पाकिस्तानने पाडल्याचे ही माध्यमे जगभर दाखवत आहेत. त्यानुसार भारताची किती विमाने पडली? या घटनेत नेमके काय झाले? याचे कुठेच स्पष्टीकरण होताना दिसत नाही. यापूर्वी झालेल्या युध्दाची माहिती त्या त्या पंतप्रधानांनी दिली होती. त्यामुळे मोदींनी देखील विरोधी पक्षांची बैठक बोलवावी तसेच आठवडाभराचे अधिवेशन घ्यावे, हे अधिवेशन इन कॅमेरा असावे तरच नेमकी माहिती जनतेसमोर येईल.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इतर देशांना माहिती देण्यासाठी सात शिष्टमंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात खासदार, सनदी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, काँग्रेसला विश्वासात न घेता या शिष्टमंडळाबाबत मोदी सरकारने राजकारण खेळले आहे. काँग्रेसने जी नावे दिली होती, ती वगळून इतर नावांचा समावेश या शिष्टमंडळात सरकारतर्फे करण्यात आला आहे. सिंदूर हल्ल्यामध्ये जे दहशतवादी मारले गेले, त्यांची नावे सरकारने जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भात निश्चित भूमिका ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईत बैठक घेतली. मात्र, या शिष्टमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधी आमदारांना टाळले गेले आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले