

सातारा : सातारा पालिकेत नगरसेवक पदाच्या मोजक्या जागा असताना नगरसेवकपदी संधी देताना ज्यांनी विकासकामे केली. लोकांसाठी जे झटले त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. निकष लावताना आवडता-नावडता असा भेदभाव केला नाही. त्यामुळे भाजपातून नाराज होऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अपक्षांनी उमेदवारी अर्ज काढून अधिकृत उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलशेटवार, अमोल मोहिते प्रमुख उपस्थित होते. खा. उदयनराजे म्हणाले, साताऱ्यातील अनेक अडचणीचे प्रश्न भाजपच्या माध्यमातून मार्गी लागले. कामे पाहूनच लोक मतदान करतात. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये बदल घडतील. जागा मोजक्या असल्यामुळे उमेदवारी द्यायची कुणाला, असा प्रश्न आम्हा दोघांसमोर होता. परंतु, जे लोकांसाठी झटले, कामे केली, लोकांचे प्रश्न मार्गी लावले हाच निकष उमेदवारी देताना लावला. निवडणुकीनंतर पाच वर्षे ज्यांनी कामे केली त्यांनाच संधी देण्यात आली. साताऱ्यात जागा 50 असताना इच्छुक भरपूर होते. दुजाभाव कुणाबद्दल केलेला नाही. कुणीही त्याला का? मला का नाही? असे कुणी वाटून देऊ नये. श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही दोघेही लोकांची सेवा करणार असल्याचेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, पूर्वी दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल असे म्हटले जायचे. पण आता काँग्रेसची अशी परिस्थिती राहिली नाही. भाजपाने विकासकामे केल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढली आहे. भाजपने कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती केली. त्यामुळे जिल्ह्यात धरणांची निर्मिती होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळाले. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही दोघांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सातारा शहराला विकासासाठी प्रचंड निधी मिळत आहे. विकासकामे विनाअडथळा मार्गी लागत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे साताऱ्याला विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सातारकरांनी या बाबींचा विचार करुन भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठिशी रहावे, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.