

कराड : कराड बाजार समितीत कांद्याच्या दरात झालेल्या सततच्या घसरणीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. मागील काही दिवसांपासून बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे. सध्या कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चही भागवू शकत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पाच -दहा रूपये किलो प्रमाणे शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. कांदा उत्पादक शेतकरी पुरता आतबट्यात आला आहे.
कांदा पिकासाठी बियाणे,खत,औषधे, मजुरी तसेच वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्याचा पर्याय निवडला असला,तरी साठवणुकीचा खर्च आणि खराब होण्याचा धोका यामुळे तेही परवडणारे ठरत नाही.
दरम्यान, व्यापाऱ्यांकडून कमी दर दिले जात असल्याचीही तक्रार शेतकरी करत आहेत. शासनाने कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे पुढील हंगामात कांदा लागवड कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी संघटनांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.