

पुसेसावळी : ओगलेवाडी ते वडूज हा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय अनास्थेमुळे अत्यंत दुरवस्थेत आहे. नूतनीकरण आणि रुंदीकरणाच्या केवळ घोषणा हवेत विरल्याने या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. ओगलेवाडी ते शामगाव घाट आणि पुढे राजाचे कुर्ले या संपूर्ण पट्ट्यात रस्त्याची चाळण झाली असून, रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुसेसावळी ते वडूज हा रस्ता सिंगल (अरुंद) असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
या मार्गावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत असून वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खराब रस्त्यामुळे चालक आणि प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, मणक्यांचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत या जीवघेण्या रस्त्यावरील अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो नागरिक कायमचे अपंग झाले आहेत. इतके गंभीर अपघात होऊनही प्रशासन ढिम्म आहे. काही दिवसांपूर्वी पळशी येथे रस्त्याच्या अगदी मध्यभागी एक मोठे, धोकादायक भगदाड पडले होते. रस्त्याखालची पाईप फुटल्यामुळे हे भगदाड पडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. मात्र, काही दिवसानंतर मुरूम टाकून प्रशासनाकडून या भगदाडाची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
एकीकडे विकासाच्या गप्पा होत असताना, दुसरीकडे मात्र या मुख्य मार्गाच्या नूतनीकरणाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष का केले जात आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि प्रवासी उपस्थित करत आहेत. या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आता लोक चळवळीचे रुप घेत आहे. जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.