सातारा : पुढारी वृत्तसेवा
पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून केळवली धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ठोसेघर, कास, भांबवली येथे भेटी देऊन विविध विभागांसमवेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध उपाययोजनाही सुचवल्या.
ठोसेघर परिसरातील मालदेव धरणावर कायमस्वरूपी स्वयंसेवक नेमावा, पाण्यात पर्यटक उतरणार नाहीत याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. केळवली धबधब्यावर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून कोणत्याही सुविधा नसल्याने हा धबधबा कायमस्वरुपी पर्यटकांसाठी बंद करण्याचे त्यांनी स्थानिक यत्रणांना निर्देश देत माहिती फलक लावण्याच्या सुचना दिल्या. तरीही पर्यटक केळवली धबधब्याकडे गेल्यास पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. कास धरणावर भेट देऊन नगरपालिकेच्या अभियंत्याकडून आढावा घेतला. त्यांना धरण व सांडव्याच्या पाणलोट क्षेत्रात पर्यटक उतरणार नाहीत यासाठी प्रवेश असणारी ठिकाणे पूर्णपणे बंदिस्त करून सांडव्याच्या परिसरात व धरणाच्या भिंतीवर कायमस्वरूपी कर्मचारी व लाईफ गार्डचीही नेमणूक करावी, अशा सूचना दिल्या.
भांबवली वजराई धबधब्यास भेट दिली. यावेळी व्यवस्थापनाचा आढावा घेत उर्वरीत पायरी मार्ग त्वरित बांधून घ्यावा, आडवाटेने जंगलातून मुख्य धबधब्याच्या ठिकाणी जाणार्या वाटा पुर्णपणे बंद करून तेथे जाळी बांधावी, स्वयंसेवकांची संख्या वाढवून त्यांची नेमणूक करावी, धबधब्याच्या पाणलोट क्षेत्राकडे कोणीही जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, तुटलेले बॅरीकेटींग मजबुत करावे, तिकीट घराच्या ठिकाणी चेंजिंग रूम व ऑफीसची निर्मिती करावी, अशा सूचना देत सुट्टीच्या दिवशी व अधूनमधून पोलिसांनी पर्यटनस्थळांना भेटी देऊन हुल्लडबाजी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अल्कोमिटरने तपासणी करून मद्यधुंद असणार्या पर्यटकांची तपासणी करून त्यांना धबधब्यांकडे प्रवेश देऊ नये. गैरकृत्य करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या त्यांनी संबंधीत विभागांना सूचना दिल्या.
बांधकाम विभागाने रस्त्यावर दरड, झाडे कोसळून किंवा रस्ता खचून पर्यटक व स्थानिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी ठोसेघर वनसमितीचे अध्यक्ष शंकरराव चव्हाण, जयराम चव्हाण, भांबवली वनसमितीचे जगन्नाथ मोरे आदी उपस्थित होते.