

मिरज : मिरज तालुक्यातील पाटगाव येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील (वय ३२, रा. पाटगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन ते तीन हल्लेखोरांनी हा खून केल्याचा संशय असून पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत.
ज्ञानेश्वर पाटील हा पाटगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. आठ दिवसांपूर्वी करोली एम (ता. मिरज) गावातील काही जणांसोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून संशयित त्याच्या मागावर होते. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत पाटगाव फाट्यावरील हॉटेल शिवारजवळ आला होता.
यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून हल्लेखोरांनी त्याला गाठले. काही कळण्याच्या आतच दोन ते तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने अचानक हल्ला चढवला. ज्ञानेश्वर खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात व छातीवर सपासप वार करून त्याचा खून केला. ज्ञानेश्वर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
खुनाची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक विक्रांत संपकाळ हे पोलिस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील याचा आठ दिवसांपूर्वी ज्यांच्याशी वाद झाला होता, त्यांच्यावर पोलिसांचा मुख्य संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
ज्ञानेश्वर पाटील रेकॉर्डवरील गुन्हेगार
मृत ज्ञानेश्वर पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मिरज पूर्व भागात पाटगाव परिसरात त्याची दहशत असल्याचे सांगण्यात येते. तसेच तो गेल्या काही दिवसांपासून स्वतःसोबत हत्यार घेऊन फिरत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.