Nitin Gadkari | पालखी महामार्ग हरित व सुरक्षित करणार : मंत्री गडकरी

लोणंद, फलटण गावांना जोडण्यासाठी बायपास
Nitin Gadkari | पालखी महामार्ग हरित व सुरक्षित करणार : मंत्री गडकरी
Published on
Updated on

पुणे/फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि वारकरी परंपरेशी जोडलेला आध्यात्मिक विकासमार्ग आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पालखीचा मार्ग तयार करण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्यासाठी केवळ प्रकल्प नाही, तर श्रद्धेचा विषय आहे. वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी आधुनिक, हरित सुरक्षित पालखी महामार्ग उभारण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाची पाहणी केल्यानंतर सुरवडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जेजुरी येथे 250 कोटी रुपये तरतुदीसह 2 कि.मी. लांबीचा जेजुरी उड्डाणपूल, दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात, त्या तोंडले याठिकाणी 100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह उड्डाणपूल व प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी एअरपोर्ट जंक्शन विकसित करून तेथे फ्लायओव्हर बांधणे. यासह या मार्गावरील सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या महत्त्वाच्या गावांना बायपास देण्यात आले आहेत. जेणेकरून जड वाहतूक गावाच्या बाहेरून जाईल, अशा घोषणाही ना. गडकरी यांनी केल्या.

ना. गडकरी म्हणाले, पालखीमार्गाच्या सहा पॅकेजेसचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गाची पाहणी करताना गडकरींनी फक्त रस्त्यांचा आढावा घेतला नाही, तर स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये प्रामुख्याने जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, तिथे 2 कि.मी. लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे.

फलटण शहरासाठी गडकरींनी 97 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. ते म्हणाले ‌‘वन-टाईम इम्प्रूव्हमेंट‌’ तत्त्वावर शहरातील अरुंद रस्ते आणि राव रामोसे पुलाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, काम पूर्ण झाल्यावर पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना मार्गक्रमण करणे सोयीचे होणार आहे. निरा रोडवर 72 मीटरचा सिंगल स्पॅन रेल्वे उड्डाणपूल बांधला जाईल. दोन्ही पालखीमार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्या तोंडले येथे 100 कोटी रुपये खर्चाचा भव्य उड्डाणपूल उभारला जाणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री गडकरी गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करून पत्रकारांसोबत बसमधून प्रवास करत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. पालखीमार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या सहा महिन्यांत हा संपूर्ण मार्ग भाविकांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. बस प्रवासादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले, वारकऱ्यांची श्रद्धा असलेल्या या मार्गासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news