

कराड : कराड शहर व परिसरात पोलिसांनी चार दिवसांपूर्वी (एम. डी.) ड्रग्जची विक्री करणार्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून सुमारे 10 ग्रॅम वजनाचे (एम. डी.) ड्रग्जसह तिघांना ताब्यात घेतले होते. या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे देशाबाहेर असल्याची शंका आल्याने पोलिसांची तीन पथके मुंबईसह इतर ठिकाणी तपासास गेले होते. या पथकाने मुंबईतून दोन परदेशी नागरीकांसह पाच तर कराडातून आणखी चार संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या कारवाईत संशयितांकडून आणखी 20 ग्रॅम (एम. डी.) ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत (एम. डी.) पोलिसांनी बारा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण सुमारे 30 ग्रॅम वजनाचे (एम. डी.) ड्रग्ज हस्तगत केले आहे. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर व परिसरामध्ये ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यांच्या पथकाने कारवाई करून याप्रकरणी प्रथम तिघांना सुमारे 10 ग्रॅम (एम. डी.) ड्रग्जसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणात आणखी काही संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी डीवायएसपी कार्यालयाचे पथक, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि उंब्रज पोलिस ठाण्याचे एक पथक अशी तीन पथके तयार केले. तपासासाठी मुंबईला रवाना झालेल्या पथकाने मुंबईततून पाच संशयितांना ताब्यात घेतले. यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर अन्य तिघे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे. दुसर्या दोन पथकांनी कराडातून अन्य चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे आणखी 20 ग्रॅम (एम.डी.) ड्रग्ज मिळाले. कराडमधील ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असून त्यांची माहिती पोलीस घेत आहेत.