

सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचार्यांनी पुकारलेला संप राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी 23 व्या दिवशी मागे घेण्यात आला. ना. आबिटकर यांनी संघटनेतील पदाधिकार्यांची बैठक घेऊन 13 पैकी 10 मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. तसे लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकार्यांना सुपूर्त केले.
दि. 14 मार्च 2024 रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी 19 ऑगस्टपासून एनएचएमच्या राज्यभरातील अधिकारी व कर्मचार्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होते. विविध मागण्यांसाठी आरोग्य सेवेतील 16 संघटनांनी प्रथमच एकत्रित येऊन यात सहभाग घेतला होता. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी एकत्रीकरण संघटनेशी सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढला. यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक विजय गायकवाड, अॅड. भाग्यश्री रंगारे, श्रीधर पंडित, गौरव जोशी यांच्यासह इतर राज्य समन्वयक उपस्थित होते. तत्पूर्वी आयुक्त कादंबरी बलकवडे आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे संचालक नितीन अंबाडेकर यांच्याबरोबर विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक बैठक झाली.
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, समायोजन प्रक्रियेसह कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लागावे, अशी माझी कायमच आग्रही भूमिका होती. परंतु, हे प्रश्न सोडवताना भविष्यात त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी मी प्रयत्नशील होतो. सामान्य प्रशासक, ग्रामविकास, नगरविकास, वैद्यकीय शिक्षण यांच्या देखील मी सातत्याने संपर्कात होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अजित पवार हेही मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. मागण्यांची अंमलबजावणी करताना शासकीय पातळीवर सकारात्मकता असली तरी प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पडताळणी आणि पूर्तत: करण्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागेल. उर्वरित मागण्या समायोजनासंदर्भात असल्याने त्यातील तांत्रिक बाबींना लागणारा विलंब लक्षात घेता, त्यावरही लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन ना. आबिटकर यांनी दिले. तसेच पुढील समन्वय व पाठपुराव्यासाठी संघटनेस समिती स्थापन करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
समन्वयक विजय गायकवाड म्हणाले, आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या आश्वासक चर्चेनंतर त्याक्षणी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. समायोजनाबाबत पहिल्या टप्प्यात 10 वर्षाहून अधिक सेवा पूर्ण झालेल्या 13 हजार कर्मचार्यांना फायदा होणार असून भविष्यात सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचार्यांना त्याचा लाभ होईल. काही मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, याची आम्हाला कल्पना असून यासाठी शासन व प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.