Satara News : ‘नवीन महाबळेश्वर’ दिशा बदलणार की दशा करणार?
गणेशचंद्र पिसाळ
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात नैसर्गिक साधन संपत्ती ही शाप की वरदान हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्यटन व्यवसाय वाढीसाठी अपेक्षित फायदा घेतला तर येथे नवनवीन पर्यटन प्रकल्प व रोजगार, व्यवसाय निर्मितीची साधने उपलब्ध होऊ शकतात. नवीन महाबळेश्वर प्रकल्पात संधी असूनही दुर्दैवानं अशा गोष्टी घडताना दिसत नाहीत. पर्यटनासाठी केवळ कागदी घोडी नाचवण्यापेक्षा स्थानिक पातळीवर पर्यटन वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.
पाटण तालुक्यात नैसर्गिक भूकंप, अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन अशा आपत्तीने वर्षांनुवर्षे ग्रासले आहे. हीच आपत्ती इष्टापती बनवत येथे पर्यटन पूरक अनेक बाबी राबवणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांत तालुक्यात प्रामुख्याने पर्यटनासह स्थानिक पवनचक्क्या अथवा अन्य उद्योगांना राजकीय ग्रहण लागल्याने स्थानिक रोजगार, व्यवसाय निर्मितीला मोठ्या प्रमाणावर खिळ बसली आहे. कोयना हे पर्यटनाचे निश्चितच हब बनू शकले असते मात्र दुर्दैवाने नेहरू गार्डन असो अथवा कोयना धरणाजवळील बोटिंग यातून स्थानिक पर्यटनाला राजकीय खो घालण्यात आला.
वर्षांनुवर्षे कोयना बकाल करण्याचे पाप प्रशासनाला हाताला धरून झाले. तालुक्यातील नैसर्गिक, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे विकसित करणे, जनतेला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार, व्यवसाय, उदरनिर्वाह निर्माण करून देणे यासाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक आहेत. नवीन महाबळेश्वर प्रकल्प तब्बल एकवीस वर्षांनंतरही केवळ कागदोपत्रातच अडकवण्यात शासन, प्रशासनाला धन्यता वाटत आहे. या प्रकल्पाविषयी कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात आली नाही. गावनिहाय आरक्षण जाहीर करताना संबंधित सर्वे नंबरवर मालकी हक्क असलेल्या जमिनीत नक्की पार्किंग, शाळा इतर आरक्षण कशा पद्धतीने टाकण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती अथवा मार्गदर्शन केले जात नाही.
वास्तविक मूळ जमीन मालकांचा तो अधिकार असतानाही याबाबत त्यांना विचारात न घेतल्याने याच जमिनींवर त्यांच्या सोयीने व इच्छेने ज्या काही गोष्टी करायचे आहेत त्यावर कमालीची बंधने आली आहेत. या सगळ्यात गोरगरीब जनतेची पिळवणूक होत असून त्यांना न्याय देण्याचा कोणताही प्रयत्न होत नसल्याचेही आरोप होत आहेत. एका बाजूला पर्यावरण पूरक प्रकल्पांच्यामुळे स्थानिक मेटाकुटीस आले आहेत. यापूर्वी शासनाकडून पर्यटन पूरक अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र त्या आश्वासनांचे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
याबाबत पुढील काळात शासन, प्रशासनाला पर्यटन वाढ आणि त्यासाठी अनुदान प्रोत्साहन आदी सर्व बाबतीत सकारात्मकतेने बनवल्याशिवाय आता पर्याय नाही. यासाठी स्थानिक नेत्यांसह जनतेनेही सकारात्मक व आक्रमक पावले उचलणे पाटणच्या सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे.
‘...त्यांनी’ मनात आणले तर सर्व काही शक्य.!
राज्याचे पर्यटन मंत्री म्हणून शंभूराज देसाई कार्यरत आहेत. तर भाजपाच्या प्रवेशाने सत्यजितसिंह पाटणकर यांनाही कमालीची ताकद मिळाली आहे. या दोघांनीही पाटण तालुक्याचा सर्वांगीण विकास लक्षात घेता प्रामुख्याने पर्यटनासाठी सर्वाधिक ताकद लावली आणि नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारत कोयनेचे बंद बोटिंग सुरू केले, नेहरू उद्यानासह स्थानिक धार्मिक, पर्यटन, अध्यात्मिक, नैसर्गिक स्थळे विकसित केली तर तालुका सुजलाम, सुफलाम, समृद्ध होईल यात शंकाच नाही.

