

सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे झेडपीत नवा राजा नवा कायदा याप्रमाणे कामकाज सुरू आहे. अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून काम वाटपाच्या शिफारशी अध्यक्षांच्या सहीने देण्याचा फंडा वापरला आहे. अध्यक्षांनी शिफारस वाटप करणे हे कोणत्या निकषाला धरून आहे, अशी कुजबूज ठेकेदारांमध्ये सुरू आहे.
जिल्हा परिषद काम वाटप समिती ही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कामे (मुख्यत: बांधकाम) वाटप करण्यासाठी स्थापन केलेली समिती आहे. ही समिती सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था आणि इतर कंत्राटदारांना कामे वाटप करत असते. कामे लॉटरी पद्धतीने किंवा इतर प्रक्रियेने वाटप केली जातात. काम वाटप समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. समितीचे सचिव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असतात. मात्र सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्या नवा राजा नवा कायदा असेच राज्य सुरू आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये सर्व काही अलबेल सुरु असल्यानेच विविध विभागाचे एक एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. झेडपीतील सर्वच विभागांतील अधिकार्यांवर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याने हम करे सो कायदा या प्रमाणे कामकाज सुरु आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिफारशी अभावी कामे रखडल्याचे चित्र दिसत असून झेडपीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. याबाबतचा लेखाजोखा दैनिक ‘पुढारी’ने प्रसिध्द करताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने रखडलेल्या काम वाटपाच्या शिफारशी देण्यास प्रारंभ केला आहे. मात्र शिफारस वाटपामध्येही नवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षाची परंपरा मोडीत काढून काम वाटप समितीचे अध्यक्षांच्या सहीनेच शिफारशी वाटण्यात येत असल्याचे चित्र झेडपीत पहावयास मिळत आहे. आतापर्यंत सर्वसाधारण काम वाटप समितीचे शिफारस पत्र हे सचिवांच्या सहीनेच दिली जात होती. आता मात्र जिल्हा परिषदेमध्ये नवा फंडा सुरु झाला आहे. अध्यक्षांच्या सहीने शिफारस पत्र वाटली जात आहेत. मात्र ही शिफारस पत्रे कोणत्या निकषाला धरुन वाटली जात आहेत हे समजून येत नाही. याबाबतची कुजबूज ठेकेदारामध्ये सुरु आहे.
‘पुढारी’च्या दणक्यानेच प्रशासनाला जाग येवून शिफारस पत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत शिफारस पत्रे देण्यास का विलंब लावला? सचिवांच्या सहीने देण्यात येणारी शिफारस पत्रे अध्यक्षांच्या सहीने का देण्यात आली? शिफारस पत्रे कोणत्या निकषाला धरुन वाटली जात आहेत, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.