

सातारा : नवीन शैक्षणिक धोरण राज्यासह भावी पिढीसाठी दूरगामी चांगला परिणाम देणारे आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस पूरक ठरत आहे. मात्र, या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षण संस्था, शिक्षण तज्ञ व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांची मानसिकता चांगली राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे उपाययोजना राबवण्याची मागणी सातार्यातील सामाजिक कार्यकर्ते व इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.
प्रचलित शिक्षण पध्दतीमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणही राबवण्यात येत आहे. हे धोरण गुणवत्ता वाढीसाठी पूरक असले तरी त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी संबंधित घटकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगून राजेंद्र चोरगे म्हणाले, त्या अनुषंंगाने शिक्षण संस्था, शिक्षण तज्ञ व शिक्षकांसाठी काही उपाययोजना राबवण्याची गरज आहे. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रावरील होणार्या खर्चापैकी 90 टक्के शिक्षकांच्या पगार व देखभालीवर होतो तर मुलांच्या शिक्षणावर केवळ 10 टक्केच खर्च होत असल्याने शिक्षणाचे बजेट वाढवले पाहिजे.
विविध शिक्षण शाखांसाठी रिसर्च सेंटर स्थापून त्यामध्ये अनुभवी शिक्षणतज्ञांची नेमणूक केली पाहिजे. सृजनशील, प्रयोगशील विद्यार्थी तयार होण्यासाठी शिक्षण पध्दतीमध्ये भारतीय संस्कृती, नैतिकता व योग, ध्यान, आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, वेद, उपनिषद आदिंचा अभ्यासक्रमात समावेश करावा. ऑनलाईन गेम, सोशल माध्यमांवर शिक्षण मंडळाचा कंट्रोल ठेवून त्यासंबंधीच्या जाहिरातींवर बंदी घालावी. व्यवसायिक कौशल्य शिक्षण, आर्थिक साक्षरता व बचत, कौशल्य विकास, नेतृत्व व व्यवस्थापन विकास, पारंपारिक खेळ,अंधश्रध्दा निर्मूलन, एनसीसी किंवा प्राथमिक सैनिकी शिक्षण आदिंचा समावेश शिक्षण पध्दतीत होणे आवश्यक आहे. सुसंस्कृपणाचे धडे देणारा दुवा म्हणजे शिक्षक असल्याने त्यांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करण्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केले.