Phaltan news: फलटणच्या न्यायप्रवासाचे नवे पर्व

वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन
Phaltan news
Phaltan news: फलटणच्या न्यायप्रवासाचे नवे पर्वPudhari
Published on
Updated on

फलटण : फलटणच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा क्षण रविवारी अनुभवायला मिळाला. वरिष्ठ स्तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याने फलटणच्या न्याय लढ्याला नवे बळ मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या उपस्थित झालेल्या या दिमाखदार सोहळ्याने फलटणच्या न्याय प्रवासाचे नवे पर्व सुरु झाले.

याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील, फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एन. एम. जाधव, जिल्ह्यातील न्यायमूर्ती, बार असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर म्हणाले, जिल्हा न्यायालय फार लांब असणे न्यायदानासाठी योग्य नाही. पक्षकार व साक्षीदारांना प्रचंड त्रास सहन करतो. फलटणमध्ये कोर्टाची साखळी पूर्ण झाली आहे. सर्व न्यायालयात 30 ते 40 वर्षांची प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायाधीशांना जसे नियम आहेत तसेच वकिलांनाही असले पाहिजेत. जिथे गरज तिथे नियमांचा काटेकोर वापर झालाच पाहिजे.

न्यायमूर्ती ए. एन. पानसरे म्हणाले, माझं बालपण शिक्षण फलटणमध्येच गेले आहे. आमची माती आमची माणसं असं माझं फलटणशी नातं आहे. सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना कंपर्टेबल केले पाहिजे. केसेस जलद गतीने निकाली काढणे हीच खरी सेवा आहे.

न्यायमूर्ती राजेश पाटील म्हणाले, फलटण हे विशेष ठिकाण आहे. येथे जिल्हा न्यायाधीश आधी आणि सीनियर डिव्हिजन नंतर आले ही वेगळी बाब आहे. वकिलांनी पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे.

न्यायमूर्ती संजय देशमुख म्हणाले, न्याय देण्यास उशीर होणे हा आपल्या व्यवस्थेवरील काळा डाग आहे, तो पुसून काढणे आपले कर्तव्य आहे. कोर्ट हे साहेबांना सॅल्यूट मारण्यासाठी नसते ते पक्षकारांसाठी असते. ग्रामीण भागातील शेतकरी हा अन्नदाता असून त्याला न्याय देणे ही पवित्र जबाबदारी आहे. फलटणच्या न्यायालयाचे उद्घाटन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उपस्थित राहणे ही गौरवास्पद बाब आहे.

जिल्हा न्यायाधीश वाघमारे म्हणाले, फलटणला न्यायालय मंजूर झाल्यानंतर न्यायाधीश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन दिवसात 2045 प्रकरणे साताऱ्यावरून फलटण येथे वर्ग केली. न्यायालयात ई सुविधा व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था उपलब्ध असून सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाज येथे सुरू होणार आहे. फलटणच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे.

फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एन. एम. जाधव म्हणाले, फलटण ते सातारा 70 किलोमीटर अंतर पार करताना अनेक वकील पक्षकरांना अपघाताचा सामना करावा लागला. वेळ पैसा हा मानसिक त्रास नित्याचा झाला होता. आज हे न्यायालय सुरू झाल्याने फलटणकरांचा मोठा भार हलका झाला आहे.

न्यायाधीश एस. पी. सय्यद म्हणाले, जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून न्यायदान जलद गतीने करण्याचा अधिक प्रयत्न करणार आहे. वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन झाल्याने फलटणकरांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या नवपर्वामुळे फलटणकरांना न्यायाचा दरवाजा आपल्याच परिसरात उपलब्ध झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news