Satara News
Satara News: साताऱ्यातील हुतात्मा उद्यानाची दूरवस्थाPudhari

Satara News: साताऱ्यातील हुतात्मा उद्यानाची दूरवस्था

मुलांच्या खेळण्यांनी पकडला गंज : शहरातील अनेक बागांमधील सुविधा मोडकळीस
Published on

सातारा : साताऱ्यातील सार्वजनिक बागांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेंडामाळ नाक्यावरील हुतात्मा उद्यानाची तर मोठी दूरवस्था झाली असून चिमुकल्यांच्या खेळण्यांची वाट लागली आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारलेल्या शहरातील काही बागा अक्षरश: बेवारस असल्याचे चित्र आहे. लहान मुलांच्या खेळण्यांनी गंज पकडला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणीय समतोलासाठी शहराचे फुफ्फूस म्हणून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या बागांची देखभाल आणि दुरूस्ती वेळेवर होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

शहराच्या फुफ्फुसांप्रमाणे काम करणाऱ्या बागांमध्ये हिरवळ, स्वच्छता आणि सुरक्षितता अपेक्षित असते. मात्र, गेंडामाळ नाक्यावरील हुतात्मा उद्यानासह अनेक बागांमध्ये तणकट वाढले असून वेळेवर काढून निगा राखली जात नाही. बागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. विशेषत: लहान मुलांसाठी बसवण्यात आलेले झुले, घसरगुंडी, फिरकी अशी खेळणी मोडक्या-तोडक्या अवस्थेत पडून आहेत. काही ठिकाणी लोखंडी खेळण्यांना गंज चढला असून त्यावर धारदार कडा तयार झाल्याने मुलांना दुखापत होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरात खेळण्यासाठी मोकळी मैदाने कमी होत असताना बागाच मुलांसाठी एकमेव पर्याय ठरत आहेत.

परंतु या बागांतील असुरक्षित खेळणी आणि निष्क्रिय यंत्रणा पाहता नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. बागांच्या देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. केवळ उद्घाटनाचा गाजावाजा करून कर्तव्यातून मोकळे न होता जबाबदारी घेऊन बागांकडे लक्ष दिले पाहिजे. वृक्ष विभागाने तातडीने पाहणी करून मोडकळीस आलेली खेळणी, बागांमध्ये वाढलेले गवत, साचलेले कचऱ्याचे ढिग काढून गंजलेली खेळणी व नादुरूस्त साहित्य बदलावे आणि नियमित स्वच्छता ठेवावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news