TET paper leak: आधी विद्यार्थ्यांचा ‘नीट’ तर आता गुरुजींचा ‘टीईटी’ फुटला

सोशल मीडियावर उपरोधात्मक प्रतिक्रिया : गमतीदार मेसेजही व्हायरल
TET exam paper leak
TET exam paper leakFile Photo
Published on
Updated on

शिखर शिंगणापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत रविवारी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महाटीईटी परीक्षा पेपर फुटल्याने रद्द करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे टीईटी परीक्षा रद्द झाल्याने शिक्षक होऊ घातलेल्या तसेच सेवेत असलेल्या लाखो शिक्षकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नीट पाठोपाठ टीईटीचे पेपर फुटल्यानंतर सोशल मीडियावरून उपरोधात्मक प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत.

पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या डीएड तसेच बीएड धारक शिक्षकांनी ऑगस्ट २०२८ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नोकरीत असलेल्या दोन लाख शिक्षकांसह नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या जवळपास ६ लाख उमेदवारांनी २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र परीक्षा अवघी एक दिवसावर आली असताना टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने टीईटी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले.

नीट परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटून परीक्षा रद्द झाल्याने शिक्षक संघटना तसेच लाखो शिक्षकांतून समाजमाध्यमांवर संतापजनक व उपरोधात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच २०१३ पूर्वी सेवेत असलेले शिक्षक तत्कालीन निवडमंडळ परीक्षा, तसेच स्पर्धा परीक्षा, पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत लागलेले आहेत, त्यामुळे या सर्व शिक्षकांची सुटका व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत.

बारावीनंतर वैद्यकीय प्रवेशासाठी पात्रता परीक्षा असलेल्या नीट परीक्षेचा पेपर मे महिन्यात फुटल्याने नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावी परीक्षा दिलेल्या काही पाल्यांचे आई-वडील शिक्षक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेत कायम राहण्यासाठी शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास दोन लाख शिक्षक २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा देणार होते. मात्र नीट पाठोपाठ टीईटी परीक्षेचा पेपरही फुटल्याने शिक्षक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दैनंदिन शैक्षणिक कामकाज करत शिक्षकांनी परीक्षेची तयारी केली होती. परीक्षेसाठी मराठी व्याकरणातील कर्तरी, कर्मणी, भावेप्रयोग हे घटक आहेत. पेपर फुटीनंतर ‘टीईटीचा पेपर फुटला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा अशी गमतीदार विधाने सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. ‘एक जण म्हणत होता, फुटलेला पेपर सरावासाठी मिळावा.’ असे गमतीदार तसेच उपरोधात्मक मेसेज सोशल मीडियावरून फिरत आहेत. तर ‘आमदार फुटतात, खासदार फुटतात, पक्ष फुटतात, पेपर फुटतात.. आता ढग तेवढे फुटू दे रे महाराजा..’ अशा प्रकारचे मेसेज आहे समाज माध्यमांवरून फिरत आहेत.

न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा...

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षा परिषदेमार्फत कडक नियमावली जाहीर करण्यात आली असून परीक्षेला जाताना चेहरा झाकायचा नाही, मास्क तसेच बुरखा घालायचा नाही, टोपी घालायची नाही, पायात बूट घालायचा नाही, घड्याळ घालायचे नाही, सोबत मोबाईल ठेवायचा नाही, पारदर्शक पॅड, पारदर्शक पाण्याची बाटली वापरायची, दीड तास अगोदर हजर रहायचे, परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्हीची नजर, पर्यवेक्षकाची करडी नजर, कडक तपासणी असे कडक नियम घालण्यात आले आहेत.

मात्र दुसरीकडे अतिशय गोपनीय असणारा पेपरच फुटत असल्याने परीक्षा पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीनंतर प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षक शिक्षकांच्या संघटना आक्रमक झाल्या असून न्यायालयाने २०१३ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनातून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news