

दहिवडी : माण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीने सोमवारी तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवला. चुरशीच्या लढतीनंतर दोन्ही बाजूंना समान मते पडल्याने अखेर चिठ्ठीद्वारे निकाल लागला आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे सभापतीपदी तर प्रियांका जगदाळे उपसभापतीपदी विजयी झाल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या होम पिचवरच नशिबाने भाजपला पराभवाचा धक्का दिला.
काही महिन्यांपूर्वी म्हसवड नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी जिंकून विरोधकांना नामोहरम करण्यात ना. जयकुमार गोरे यांना यश आले होते. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका भाजप एकतर्फी जिंकेल, अशी चर्चा सुरुवातीला रंगली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळीच घडामोड घडली. ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप तसेच स्व. सदाशिवराव पोळ यांचे सुपुत्र मनोज पोळ या सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. म्हसवड नगरपालिकेतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने एकीची भूमिका घेत योग्य उमेदवार उभे केले. त्याचा परिणाम म्हणजे बलाढ्य भाजपला थोपवण्यात राष्ट्रवादीला यश आले आणि पंचायत समितीत बरोबरी साधली.
दोन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आल्याने सभापती व उपसभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सोमवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. भाजपकडून सभापती पदासाठी अर्जुन काळे व बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब कदम यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम शिंगाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपसभापती पदासाठी भाजपकडून डॉ. राजेंद्र खाडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियांका जगदाळे यांनी अर्ज भरला. छाननीनंतर भाजपचे उमेदवार बाळासाहेब कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या मतदानात दोन्ही बाजूंना समान पाच-पाच मते पडली. परिणामी लहान मुलांच्याहस्ते चिठ्ठीद्वारे निकाल काढण्यात आला. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे विजयी ठरले. उपसभापती पदासाठीही तसाच पेच निर्माण झाला. समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निकाल काढण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका भुजंगराव जगदाळे विजयी झाल्या.
विजयानंतर सभापती विक्रम शिंगाडे व उपसभापती प्रियंका जगदाळे यांनी तत्काळ पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, मनोज पोळ यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अनेक निवडणुकांनंतर मिळालेल्या या मोठ्या यशामुळे कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची सिद्धनाथ मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.