

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्ह्यातील कार्यकारिणी व फ्रंटल सेलची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीची निवड लवकरच केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
आगामी येणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मान्यतेने व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या सुचनेनुसार सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष त्यांच्या सर्व तालुका कार्यकारिणी तसेच फ्रंटल सेलचे सर्व अध्यक्ष त्यांची जिल्हा व तालुका कार्यकारिणी, देश व राज्यपातळीवर विविध फ्रंटल सेलवर काम करणारे जिल्ह्यातील पदाधिकारी सर्व बरखास्त करण्यात आले आहेत.
येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जिल्हा प्रभारी आ. शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकानिहाय बैठक घेवून जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर व विविध फ्रंटल सेलवर काम करु इच्छिणार्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करुन त्यांना संधी देवून नवीन संघटना तयार करण्यात येणार आहे. तसेच नवीन कार्यकारिणी होईपर्यंत जुन्या पदाधिकारी यांनी पदाचा गैरवापर करु नये, अशा सूचना आ. शशिकांत शिंदे यांनी दिल्या आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदार संघातील काम करु इच्छिणार्या नवीन व जुन्या कार्यकर्त्यांची बैठक व मुलाखत शुक्रवार दि.2 मे रोजी बाजार समिती कोरेगाव येथे सायं. 5 वा. होणार आहे. शनिवार दि.3 मे रोजी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील रेठरे बुद्रुक येथे दु.3 वाजता बैठक होणार आहे व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील येथे सायं. 5 वाजता बैठक होणार आहे. रविवार दि.4 मे रोजी वाई विधानसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यातील बैठक महाबळेश्वर येथे सकाळी 11 वा. व वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक दु.3 वा रेस्ट हाऊस वाई येथे होणार आहे. खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक सायं. 6 वा. रेस्ट हाऊस खंडाळा येथे होणार आहे.
तसेच बैठकीचा दुसरा टप्पा नंतर जाहीर करण्यात येईल. वरील सर्व बैठकीस पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष सुनिल माने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.