

सातारा : महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि स्वाभिमानाशी निगडित या विषयात न्याय मिळेपर्यंत आम्ही छत्रपती घराण्यासोबत असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने तज्ज्ञ इतिहासकारांची समिती गठित करून वस्तुनिष्ठ व पुराव्याधारित अहवाल केंद्र शासनास सादर करून योग्य स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री यांची त्यांच्या सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे श्रीमंत वृषालीराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी वृषालीराजे भोसले यांनी एनसीईआरटीकडून इयत्ता आठवीच्या इतिहास अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा केली. या विषयाचे ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम त्यांच्यासमोर मांडले.
यावेळी समीर जाधवराव, नीलेश झोरे, किशोर ढगे, ओंकार ढोंबे, राहुल मोकाशी, विक्रम क्षीरसागर, गणेश चोरगे, विक्रमादित्य साळुंखे, अरबाज शेख व छत्रपती फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.